Thu, Jun 4, 2026
सहकार सातारा जिल्हा

मलिद्यासाठी केलेल्या नोकरभरतीचा नाहक बोजा सभासदांच्या माथी

मलिद्यासाठी केलेल्या नोकरभरतीचा नाहक बोजा सभासदांच्या माथी
Ashok Ithape
  • PublishedSeptember 9, 2023

आधीच्या संचालक मंडळांनी केलेली घाण निस्तरण्यास प्राधान्यः बलवंत पाटील

सातारा / प्रतिनिधी :

स्वतःची तुंबडी भरण्यासाठी सभासद हिताचा विचार वाऱ्यावर सोडून चार ते पाच वर्षात भ्रष्ट व गैरकारभाराचा कळस गाठणाऱ्या विरोधकांची फसवणुकीसह विविध आर्थिक गुन्ह्याअंतर्गत कोर्टाच्या आदेशाने चौकशी प्रलंबित आहे. अशा डागाळलेल्या विरोधकांनी सध्याच्या सत्ताधारी संचालक मंडळावर आरोप करणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा…’ असा प्रकार आहे. त्यांनीच मलिद्यासाठी केलेल्या नोकर भरतीचा नाहक बोजा प्रामाणिक सभासदांवर, कर्जदारांवर पडला आहे. ती घाण आम्ही सध्या साफ करीत आहोत. कायद्यानुसार सर्व प्रक्रिया होतीलच, आता सोशल मीडियातून आरोप करणाऱ्या विरोधकांनी बँक, सभासद, कर्जदार यांचा पुळका आणू नये. त्यांनी त्यांची स्वतःची चिंता करावी, असा सज्जड इशारा शिक्षक संघाचे नेते व माजी चेअरमन बलवंत पाटील यांनी दिला आहे.

सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या होणाऱ्या ७६ व्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने विरोधकांनी विद्यमान संचालक मंडळावर केलेल्या आरोपांचाआपल्या परखड शब्दात समाचार घेताना बलवंत पाटील म्हणाले, भ्रष्टाचाराची विविध कलमे दाखल असलेल्या विरोधकांचा सध्या एक कलमी कार्यक्रम सुरू आहे, तो म्हणजे बँकेची बदनामी करणे, हा होय. बँकेचे तारणहार आपणच होतो, अशी वल्गना करणाऱ्यांना सध्या बँकेची भलतीच चिंता सतावत आहे. सत्तेवर असताना केलेल्या पापांचे शुक्लकाष्ठ काही केल्या त्यांची पाठ सोडत नसल्याने ते सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो, की आपण केलेल्या गैरकारभाराच्या फायलींचा ढीग माझ्या टेबलवर असून त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. संचालक मंडळ दिशाहीन व सभासद वा-यावर म्हणणाऱ्यांना ही कायदेशीर रित्या बसत असलेली चपराक असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक सभासदांतून उमटत आहेत. मागील संचालक मंडळांने दहा टक्के व एकदा ९ टक्के लाभांश दिला. त्यातील पहिली तीन वर्षे मी स्वतः चेअरमन होतो, तर नंतरची चार वर्षे राजेंद्र घोरपडे चेअरमन होते. मी जबाबदारीतून बाजूला का झालो हे सुज्ञ सभासदांना माहिती आहे. त्यांच्या पापाचा सोबती असण्यापेक्षा बाजुला जाणे मला इष्ट वाटले. त्यांची गैरकृत्ये माझ्या सत्सत् विवेकबुद्धीला न पटणारी होती. समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या शिक्षक सभासदांना हे सांगण्याची गरज नाही, पण या सभेच्या निमित्त सोशल मीडियात आरोपांचे कागदी बाण सोडणा-या विरोधकांचा हिशोब तर चव्हाट्यावर आणला पाहिजे, असे सांगून बलवंत पाटील पुढे म्हणाले, पहिल्या तीन वर्षात मी बँकेचा चेअरमन असताना त्या वेळच्या वार्षिक सभा सर्वांनी डोक्यावर घेतल्या. आजही त्यावेळचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यावेळी माझ्या स्वच्छ कारभारामुळे जल्लोष करणारे विरोधक त्यात दिसत आहेत. हवे तर त्यांना हे व्हिडिओ पाठवतो.

घेतल्यापासून बँकेच्या कारभारात सुधारणा करताना कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त पगार, त्यांना मिळणाऱ्या गैरवाजवी सुविधा कमी करून त्या गोठवण्यात आल्या. त्यामुळे एकूणच खर्चाला कात्री लागली. सुमारे एक कोटी २० लाख रुपयांची बचत झाली. त्याचा सभासदांसाठी फायदा असा झाला की कर्जावरील व्याजदर कमी झाला. सन २००९ ते २०१५ या काळात तत्कालीन संचालक मंडळांने केलेली २६ जणांची नोकरभरती रद्द करण्यात आली. कारण एकूणच बँक व तिच्या शाखा, कामाचा आवाका पाहिला तर बँकेला १०० कर्मचारी पुरेशे होते. तरीही २६ कर्मचारी आर्थिक लाभासाठी भरती करण्यात आले होते. माझ्या काळात बँकेतील चुकीच्या गोष्टी टाळून अतिरिक्त व अवास्तव खर्चात बचत केली. म्हणून पहिल्या तीन वर्षात साडेतीन ते चार कोटी रुपयांचा फायदा बचत व उत्पन्नातून मिळाला. २००९ ते २०१५ या काळातील संचालक मंडळाचा खर्च तब्बल १० कोटी ५४ लाख होता. मी पदभार घेतल्यावर तो नऊ कोटी रुपयांवर आला, सुमारे एक कोटी २० लाख रुपयांची बचत झाली.

माझ्या कारकिर्दीची तीन वर्षे म्हणजे बँकेच्या प्रगतीच्या काळातील सोनेरी तीन वर्ष म्हणून गौरवतात. हे मी माझे कौतुक सांगत नसून सुज्ञ सभासदांचे मत आहे. हे मत त्यांनी यावर्षीच्या निवडणुकीच्या मतदानातूनही व्यक्त केले आहे. माझ्या नंतरच्या चार सर्वसाधारण सभा सर्व सभासदांनी पाहिल्या आहेत. त्या सभा पाच – पाच मिनिटात का गुंडाळण्यात आल्या? काही सभा ऑनलाईन घेण्याची नामुष्की संचालकांवर का आली? याची उत्तरे विरोधकांनी निवडणुकीतही दिली नाहीत व आताही देणार नाहीत. सभा गुंडाळून व ऑनलाईन घेऊन सभासदांची त्यांनी केलेली लूट त्यांना दडपून  ठेवायची होती. अशा विरोधकांना विद्यमान संचालक मंडळाचा कारभार चुकीचा वाटतो, हे हास्यास्पद नव्हे तर लज्जास्पद आहे. हा प्रकार म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा, असा आहे. त्यांनी केलेल्या गैरकृत्यांची, पापांची शिक्षा त्यांना लवकरच कायदेशीर प्रक्रियेद्वारे मिळणार आहे.

बलवंत पाटील पुढे म्हणाले, सन 2015 मध्ये  मी चेअरमनपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आधीच्या संचालक मंडळाने २६ जणांची केलेली भरती गैर असल्याचे निदर्शनास आणून दिले. बँकेने कोर्टात धाव घेतली. बँकेतील हस्तक्षेप व बजबजपुरीमुळे मी बाजूला झाल्यावर याच विरोधकांनी कोर्टाने कामावरून काढण्याचा आदेश दिलेल्या पैकी २५ जणांना कामावर घेतले. कोर्टात जाताना त्यांना अतिरिक्त लाभ व नोकरीत नसलेल्या १५ महिन्यातील काळाचा पगार द्यावा लागेल, असे कारण कारण दिले होते. विशेष म्हणजे त्याच संचालक मंडळाने व आताच्या विरोधकांनी त्यावेळी २६ पैकी २५ जणांना आर्थिक तडजोडी करून पुन्हा कामावर घेतले. एवढेच नव्हे तर त्या २५ जणांना १५ महिन्याच्या काळातील पगार देण्यात आला.

सर्वात कडी म्हणजे तात्पुरत्या नोकरांना कायम करता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले असताना या सर्वांना कायम करण्यात येऊन बँकेला कधीही भरून काढता येणार नाही, अशा कोट्यावधीच्या खर्चात ढकलले आहे. आणखी एक हात मारावा म्हणून पुन्हा गरज नसताना आणखी ४४ कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.या भानगडी करताना बँकेचा, सभासदांच्या लाभाचा, हिताचा विचार केला का? बँकेचे किती नुकसान होईल ? यापेक्षा स्वतःचे खिसे कसे भरतील, याचा विचार करून भरतीचे सर्व निकष पायदळी तुडवण्यात आले. या सर्व गैरकारभाराच्या फायलींचा गठ्ठा माझ्याकडे व कायदेशीर यंत्रणांकडे आहे. याच विरोधकांनी केलेली ही गैरकृत्ये किंवा पापे सभासदांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

या फायलींच्या अनुषंगाने आज विरोधकानी खाल्लेल्या मलिद्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. कलमेच सांगायची तर कलम ४०८ यामध्ये सात ते नऊ वर्षे शिक्षेची, कलम ४०९ अंतर्गत दहा वर्षे ते जन्मठेप शिक्षेची, कलम ४१७ मध्ये एक वर्ष, कलम ४२० अंतर्गत सात वर्षे, कलम ४६३अंतर्गत तीन वर्षे शिक्षेची तरतूद आहे. अशी एकंदरीत ८-९ कलमे त्यांच्यावर लागू आहेत. अशा ह्या कलमीक व चारशे वीस विरोधकांनी आता त्यांची स्वतःची काळजी करावी, संचालक मंडळ व सभासद बँकेची काळजी घेण्यास सक्षम व समर्थ आहेत. आम्ही निवडणुकीत सभासदांना दिलेला शब्द पाळणार आहोत. ते विरोधकांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत.

त्यांच्या बजबजपुरी कारभारामुळेच लाभांश ६ % वर

सभासदांच्या हिताचा विचार न करता गैरकारभाराने केलेल्या अनावश्यक नोकरभरतीचा तोटा बॅंकेला पुढील ३५ ते ४० वर्षे सहन करावा लागणार आहे. विरोधकांनी हा मोठा घपला केला नसता तर कर्जावरील व्याजदर नऊ टक्केच्या आत आला असता. दुर्दैवाने त्यावेळी चुकीच्या माणसांकडे सत्ता गेली. माझ्या काळात बँकेत १०० ते ११० कर्मचारी हे अतिरिक्त असल्याने सेवानिवृत्ती मोहीम राबवली. मात्र नंतर पहिले २५ अधिक नंतर भरती केलेली ४४ असा ६९ कर्मचाऱ्यांचा बोजा वाढवण्यात आला. माझ्या काळातील नऊ कोटी ३४ लाखांवर आटोक्यात आणलेला खर्चाचा बोजा पुढील काळात १४ कोटी ८५ लाखांवर नेण्यात आला. त्यावेळी तत्कालीन संचालकांनी केलेली घाण आम्ही आजही उपसत आहोत. त्यांच्या बजबजपुरी कारभारामुळेच लाभांश ६ % वर आला, असे बलवंत पाटील म्हणाले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!