वाईत काँग्रेसची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक; आगामी निवडणुका व जनआंदोलनाची रूपरेखा निश्चित
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचाराला वेग; जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्याचा निर्धार
वाई, दि. ७ : पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई येथे काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक उत्साहात पार पडली. हॉटेल मधुबन, सिद्धनाथवाडी, वाई येथे झालेल्या या बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची रणनीती, संघटनात्मक नियोजन तसेच जनतेच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाची दिशा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिक्षक मतदारांशी थेट संपर्क साधून शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या उमेदवारीच्या प्रचाराला वेग देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तालुक्यातील शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
दरम्यान, दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संदर्भातील मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चाला बैठकीत पाठिंबा व्यक्त करण्यात आला. या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसी कारवाईचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला. या पार्श्वभूमीवर पक्षाची आगामी भूमिका आणि आंदोलनाची दिशा यावरही विचारविनिमय करण्यात आला.
सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाईचे उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून जनआंदोलन उभारण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस वाई तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते तसेच काँग्रेसप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रदीप जायगुडे, कल्याण पिसाळ, फय्याज बागवान, धनश्री मालुसरे, राजकुमार जगताप, दीपक मालुसारे, ब्रह्मदेव वाडकर, प्रकाश शिंदे, राजेंद्र पाडळे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आगामी कार्यक्रमाबाबत आपली मते मांडली.





















