Wed, Oct 21, 2026
सातारा जिल्हा

राज्यस्तरीय ‘अमृतवेल वाचन महोत्सवा’चा निढळ-दहिवडीतून शुभारंभ!

राज्यस्तरीय ‘अमृतवेल वाचन महोत्सवा’चा निढळ-दहिवडीतून शुभारंभ!
Ashok Ithape
  • PublishedOctober 12, 2026

चंद्रकांत दळवी, डाॅ. नितीन वाघमोडे प्रमुख पाहुणे : १०० नव्या शाळांमध्ये ‘पुस्तक वाचन व आकलन स्पर्धे’चे आयोजन

सातारा : नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाढावी, रुजावी आणि वृद्धिंगत व्हावी, यासाठी ‘अमृतवेल’च्या वतीने राज्यस्तरीय ‘अमृतवेल वाचन महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातील नव्या १०० शाळांमध्ये ‘अमृतवेल पुस्तक वाचन व आकलन स्पर्धा’ राबविण्यात येणार असून, या उपक्रमाचा शुभारंभ निढळ (ता. खटाव) व दहिवडी येथून होणार आहे. या कार्यक्रमाला निवृत्त विभागीय आयुक्त, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी आणि आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे माहिती अमृतवेलचे संस्थापक धर्मेंद्र पवार यांनी दिली.

व्यक्तिमत्त्व आणि सुजान नागरिक म्हणून जडणघडण होण्यासाठी वाचन आवश्यक आहे. म्हणूनच नव्या पिढीमध्ये वाचनातून विचार करण्याची क्षमता विकसित व्हावी आणि वाचलेल्या साहित्याचे आकलन करून ते स्वतःच्या शब्दांत व्यक्त करण्याची सवय लागावी, या उद्देशाने हा स्पर्धा आयोजित केली जाते. या राज्यस्तरीय उपक्रमात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, जालना, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड आदी जिल्ह्यांतील 100 शाळांचा समावेश होत आहे. या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत वाचनसंस्कृती पोहोचविण्याचा आणि पुस्तकांशी त्यांचे नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

वाचनातून घडणार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

आजच्या डिजिटल युगात मोबाइल, समाजमाध्यमे आणि विविध डिजिटल साधनांचा वापर वाढत असताना विद्यार्थ्यांमध्ये नियमित वाचनाची सवय विकसित करणे हे शिक्षण क्षेत्रासमोरील महत्त्वाचे आव्हान बनले आहे. वाचनामुळे केवळ भाषेचे ज्ञान वाढत नाही, तर शब्दसंपत्ती समृद्ध होते, एकाग्रता वाढते, कल्पनाशक्तीला चालना मिळते आणि स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता विकसित होते. विविध विषयांवरील पुस्तके वाचल्यामुळे विद्यार्थ्यांना समाज, संस्कृती, विज्ञान, इतिहास आणि मानवी जीवनातील विविध पैलू समजून घेण्याची संधी मिळते.
याच जाणिवेतून अमृतवेल समुहाने पुस्तक वाचन आणि आकलन यांची सांगड घालणारा हा उपक्रम हाती घेतला आहे.

अमृतवेलच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून होणाऱ्या या उपक्रमात सध्या 73 शाळांचा सहभागी आहे. आता राज्यस्तरावर आणखी १०० नव्या शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ख्यातनाम शास्‍त्रज्ञ, तत्वज्ञ आणि माजी राष्ट्रपती डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जयंती दिवस 15 ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य लक्षात घेऊन 100 शाळांमध्ये एकाच ही स्पर्धा सुरु होणार आहे. या राज्यस्तरीय वाचन महोत्सवाचा शुभारंभ खटाव तालुक्यातील निढळ (हनुमान विद्यालय आणि दहिवडी (महात्मा गांधी विद्या मंदिर) येथून होत आहे. या दोन्ही हायस्कूलमध्ये यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

वाचनातून विचार
समृद्धीचा संकल्प!

‘अमृतवेल समुहा’च्या या उपक्रमामागे केवळ स्पर्धेचे आयोजन करणे हा उद्देश नसून, विद्यार्थ्यांमध्ये आयुष्यभर टिकणारी वाचनाची सवय निर्माण करणे हे व्यापक ध्येय आहे. नियमित वाचन करणारा विद्यार्थी अधिक सजगपणे विचार करू शकतो, विविध दृष्टिकोन समजून घेऊ शकतो आणि बदलत्या जगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार करू शकतो. राज्यातील १२ जिल्ह्यांतील १०० नव्या शाळांपर्यंत पोहोचणारा ‘अमृतवेल वाचन महोत्सव’ हा विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाचा विस्तार करण्याच्या दिशेने उचललेला महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. पुस्तकांशी मैत्री, वाचनातून आकलन आणि आकलनातून विचारांची समृद्धी या सूत्रांवर आधारित ही चळवळ विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची नवी प्रेरणा निर्माण करेल, अशी भूमिका अमृतवेलचे संस्थापक धर्मेंद्र पवार यांनी मांडली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!