शेतकरी हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती उत्साहात
आधुनिक तंत्रज्ञान, AI लॅब व क्रीडा सुविधांचे उद्घाटन; विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कौशल्यांचे प्रात्यक्षिक
सातारा : प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त तारगाव येथील शेतकरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध शैक्षणिक, वैज्ञानिक व नाविन्यपूर्ण उपक्रमांनी कर्मवीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ शिक्षक श्री. कांबळे यांनी स्वखर्चातून तयार केलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच रयत शिक्षण संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील व कार्यकारी संचालक, कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे मा. कमलाकर महामुनी यांच्या शुभहस्ते विद्यालयातील AI लॅब व इंडोअर स्पोर्ट्स क्लबचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी जपानी भाषेत मान्यवरांना विद्यालयाची माहिती, तर इंडोअर स्पोर्ट्स क्लबमध्ये पाहुण्यांशी इंग्रजी भाषेत संवाद साधला. अटल टिंकरिंग लॅब व विज्ञान प्रयोगशाळेतील विविध प्रयोगांचे विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक सादर केले. तसेच इंग्रजी भाषेत मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आत्मविश्वासपूर्ण संवादकौशल्याचे दर्शन घडविले.
मुख्याध्यापक मा. किरण देवकर यांच्या प्रयत्नातून विद्यालयात करण्यात आलेल्या शैक्षणिक व भौतिक बदलांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले. बदलत्या शैक्षणिक क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यालयात विविध आधुनिक सुविधांची उभारणी करण्यात आली असून विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, भाषा, क्रीडा आणि कौशल्याधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सभेच्या कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागमय कार्याचा आणि शैक्षणिक योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला. रयत शिक्षण संस्थेची ध्येयधोरणे आणि बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या बदलांविषयी डॉ. अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
मा. डॉ. अनिल पाटील यांनी विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यालयाच्या प्रगतीचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करावा, असे आवाहन केले.
यावेळी SSC परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. बी. के. मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. अनिल पाटील उपस्थित होते. तसेच रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक मा. किरण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जगावळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सौ. कुलकर्णी यांनी मानले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम कर्मवीरांच्या विचारांना आधुनिक शिक्षणाची जोड देणारा आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा ठरला.





















