हरवलेले-चोरीचे ४४९ मोबाईल पोलिसांनी शोधून नागरिकांना केले परत
![]()
CEIR पोर्टलच्या प्रभावी वापरातून सुमारे दीड कोटींचे मोबाईल हस्तगत; २०२४ ते सप्टेंबर २०२६ दरम्यान ४,८४२ मोबाईल नागरिकांना परत

सातारा l प्रतिनिधी : हरवलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधून ते संबंधित नागरिकांना परत मिळवून देण्याच्या मोहिमेत सातारा जिल्हा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारत सरकारच्या Central Equipment Identity Register (CEIR) पोर्टलचा प्रभावी वापर करत पोलिसांनी विविध ठिकाणी वापरात असलेले मोबाईल तांत्रिक तपासाच्या आधारे शोधून काढले. यामध्ये सुमारे दीड कोटी रुपये किमतीचे ४४९ मोबाईल हँडसेट हस्तगत करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले.
विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक निरीक्षण तपासणीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या तपासणीच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस ठाणे तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमार्फत हरवलेले, चोरीस गेलेले व गहाळ मोबाईल शोधण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत मोबाईलच्या IMEI क्रमांकाच्या आधारे CEIR पोर्टलवर तांत्रिक तपासणी करण्यात आली. त्यातून मोबाईलचा वापर किंवा ठावठिकाणा शोधून संबंधित मोबाईल हस्तगत करण्यात आले. २०२४ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत मोबाईल हरवल्याच्या एकूण १४ हजार ३०० तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. त्यापैकी आतापर्यंत ४ हजार ८४२ मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले आहेत.
दरम्यान, विशेष मोहिमेत हस्तगत करण्यात आलेल्या ४४९ मोबाईलची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते संबंधित मोबाईलधारकांना हे मोबाईल सुपूर्द करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
हरवलेले किंवा चोरीस गेलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, अशा मोबाईलचा गैरवापर रोखण्यासही पोलिसांना मदत होत आहे. CEIR पोर्टलच्या प्रभावी वापरामुळे मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांच्या तांत्रिक तपासाला अधिक बळ मिळत आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळी तसेच प्रशांत मोरे, ओंकार डुबळ, संदीप पाटील, राकेश घाडगे, रामदास भास्करवाड, स्वप्नील शिंदे, किरण जगताप आणि प्रवीण फडतरे यांनी सहभाग घेतला. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.





















