म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
चोरीस गेलेला जेसीबी अवघ्या १२ तासांत हस्तगत; चोरट्याला बेड्या
सातारा : माण तालुक्यातील दिवड येथून चोरीस गेलेला जेसीबी म्हसवड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत शोधून काढत चोरट्याला बेड्या ठोकल्या. किरण प्रल्हाद घाडगे (रा. पळशी, ता. माण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे चोरी गेलेला लाखो रुपयांचा जेसीबी सुरक्षितपणे हस्तगत करण्यात आला.
मसाईवाडी (ता. माण) येथील रहिवासी महावीर पांडुरंग विरकर यांच्या मालकीचा MH 11 CW 7306 क्रमांकाचा जेसीबी चालक सागर लोखंडे (रा. दिवड) यांच्या घरासमोर उभा करण्यात आला होता. ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने हा जेसीबी चोरून नेला. याप्रकरणी जेसीबी मालकांनी म्हसवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन म्हसवड पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून तपास करत संशयित किरण घाडगे याला ताब्यात घेतले. चौकशी व तपासादरम्यान चोरीस गेलेला जेसीबीही पोलिसांनी अवघ्या १२ तासांत हस्तगत केला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची कामगिरी
ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि दहीवडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पोमण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अमर नारनवर, देवानंद खाडे, प्रकाश इंदलकर, विनोद सपकाळ, वसीम मुलानी तसेच महिला पोलीस अंमलदार मैना हांगे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.
चोरीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे गतिमान करून जेसीबीसह आरोपीला ताब्यात घेण्याची म्हसवड पोलिसांची कामगिरी परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.





















