Tue, Sep 29, 2026
सातारा जिल्हा

सातारा : सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहा; फसवणूक झाल्यास १९३० हेल्पलाइनवर संपर्क साधा

सातारा : सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहा; फसवणूक झाल्यास १९३० हेल्पलाइनवर संपर्क साधा
Ashok Ithape
  • PublishedSeptember 24, 2026

सातारा दि.24 : आजच्या संगणकीय युगात अंतर्जालाद्वारे चालणारे बँकिंग, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस , सामाजिक माध्यमे आणि विविध डिजिटल सेवांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या वाढत्या वापरासोबतच ऑनलाइन फसवणूक, बनावट दुवे (लिंक्स), एकवेळचा सांकेतांक(OTP) मागणे, बनावट ग्राहकाची ओळख पटवणारी प्रक्रिया (KYC), सामाजिक माध्यमांचे हॅकिंग आणि क्रेडिट व डेबिट कार्ड फसवणूक यांसारख्या सायबर गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक वैभव जाधव यांनी केले आहे.

काशीळ तालुका कराड येथील श्रीराम गणेशोत्सव मंडळ, श्री गणेश मंडळ, मोरया गणेश उत्सव मंडळ, विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ व योद्धा ग्रुप गणेशोत्सव मंडळ या मंडळांमध्ये लोकसंवाद-2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुदर्शन माने यांच्यासह मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

​सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार नोंदणी संकेतस्थळावर (www.cybercrime.gov.in) आपली तक्रार नोंदवावी. आर्थिक किंवा सायबर फसवणूक झाल्यानंतर जितक्या लवकर तक्रार नोंदवली जाते, तितक्या लवकर संबंधित व्यवहारावर किंवा खात्यांवर आवश्यक ती कायदेशीर व तांत्रिक कारवाई करून रक्कम सुरक्षित करण्याची शक्यता वाढते, असे जाधव यांनी सांगितले

​नागरिकांनी सायबर सुरक्षेसाठी आपला एकवेळचा सांकेतांक (OTP), गुप्त कोड (PIN) किंवा बँक खात्याचा पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नये. संदेश अथवा सामाजिक माध्यमांवर येणाऱ्या संशयास्पद व अनोळखी दुव्यांवर (लिंक्स) क्लिक करू नये. बँक अधिकारी, पोलीस किंवा सीमाशुल्क अधिकारी असल्याचे सांगून फोन करणाऱ्यांवर लगेच विश्वास ठेवू नये, कारण कोणतीही बँक दूरध्वनीवरून वैयक्तिक किंवा गोपनीय माहिती मागत नाही. खात्यातून संशयास्पद व्यवहार झाल्यास तात्काळ आपल्या बँकेच्या अधिकृत क्रमांकावर किंवा शाखेत संपर्क साधून खाते ब्लॉक करावे. तसेच कोणत्याही प्रकारची आर्थिक सायबर फसवणूक झाल्यास विनाविलंब १९३० या मोफत क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवावी असे आव्हान श्री. जाधव यांनी यावेळी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!