कामगारांच्या आरोग्यासाठी ‘अजिंक्यतारा’चा पुढाकार!
सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २०० हून अधिक कामगारांची आरोग्य तपासणी
शेंद्रे : प्रतिनिधी | महेंद्रआबा जाधव
कामगारांचे आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य देत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आणि डॉ. हॅनिमन होमिओपॅथिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावरील कामगार भवन येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला अधिकारी व कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून २०० हून अधिक कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य तथा कारखान्याचे विद्यमान संचालक श्री. सर्जेराव (नाना) सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी, कामगार तसेच मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा कारखान्याचे मार्गदर्शक मा. नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन मा. श्री. यशवंतराव साळुंखे, व्हा. चेअरमन मा. श्री. नामदेवराव सावंत, संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक मा. श्री. जिवाजीराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. सर्जेराव (नाना) सावंत म्हणाले, “कामगार हा कारखान्याचा कणा आहे. त्यांचे आरोग्य उत्तम राहणे ही कारखान्याच्या प्रगतीची गरज आहे. आजार अंगावर न काढता नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे.”
डॉ. जवाहरलाल शहा यांनी आजारांचे वेळेत निदान आणि योग्य उपचाराचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच होमिओपॅथी उपचारपद्धतीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. लेबर ऑफिसर ॲड. रणजित चव्हाण यांनी कारखान्याकडून कामगारांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या शिबिरात डॉ. जवाहरलाल शहा, डॉ. राहुल शिरकांडे, डॉ. अभयसिंह चव्हाण, डॉ. सुखदेव आपटे, डॉ. अभिजित कुचेकर, डॉ. अभिजित गुरव, डॉ. सेरा शहा तसेच वैद्यकीय पथकाने कामगारांची तपासणी केली. कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र धुमाळ यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
‘आरोग्यदायी कामगारशक्ती हीच सक्षम अजिंक्यताराची खरी ताकद’ या संदेशाने शिबिराचा समारोप झाला.
फोटो ओळ :
सर्वरोग निदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य तथा कारखान्याचे विद्यमान संचालक श्री. सर्जेराव (नाना) सावंत, डॉ. जवाहरलाल शहा, ॲड. रणजित चव्हाण, पत्रकार महेंद्र जाधव व मान्यवर.





















