Tue, Sep 29, 2026
शिक्षण

पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक
Ashok Ithape
  • PublishedSeptember 24, 2026

प्रचारसाहित्य, फलक लवकरात लवकर काढण्याची कार्यवाही करण्याचे विभागीय आयुक्तांचे निवडणूक प्रशासनाला निर्देश

पुणे : पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी जिल्हा निवडणूक प्रशासनाने तात्काळ करावी; पाचही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील राजकीय पक्षांचे, आचारसंहितेचा भंग होईल असे जाहिरात फलक, मालमत्ता विरूपण कायद्याचे उल्लंघन करणारे होर्डिंग्ज, भित्तीपत्रके, भिंतींवरील मजकूर तत्काळ काढण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले यांनी दिले.

पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक आदींची बैठक दूरदृष्यप्रणालीद्वारे श्रीमती तेली- उगले यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी आयुक्तालयाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह संबंधित जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त यावेळी म्हणाल्या, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक ते कक्ष, भरारी पथके, स्थीर सर्वेक्षण पथके, व्हिडीओ सर्वेक्षण पथके आदी स्थापन करावीत. शासकीय विश्रामगृहे, शासकीय, निमशासकीय, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार अधीनस्त सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या जागा, धार्मिक स्थळे, शाळा आदींचा उपयोग राजकीय प्रचारासाठी, बैठकांसाठी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आचारसंहिता भंग झाल्याचे आढळून आल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत.

विभागीय आयुक्त कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात येत असून सर्व जिल्ह्यात संबंधित निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात यावेत. आचारसंहितेच्या अनुषंगाने ‘काय करावे, काय करू नये?’ आदी सूचनांचे पालन व्हावे यासाठी सर्व शासकीय यंत्रणांना सूचना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

मतदान केंद्रांची प्रारूप यादी प्रसिद्ध करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने कोणतीही चुकीची माहिती पसरणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही विभागीय आयुक्त म्हणाल्या.

जिल्हा स्तरावर माध्यम प्रमाणीकरण व माध्यम संनियंत्रण समित्या कार्यान्वित कराव्यात. दूरचित्रवाणी वाहिन्या, आकाशवाणी, खासगी एफ.एम. आदी वाहिन्या, समाजमाध्यमांवरील जाहिरातींचे पूर्वप्रमाणीकरण याबाबत आयोगाच्या निर्देशांचे पालन होण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांना माहिती द्यावी, असेही श्रीमती तेली-उगले यांनी सांगितले.

यावेळी श्री. ठोंबरे यांनीही निवडणुकीच्या अनुषंगाने आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!