महाबळेश्वरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी संबंधाच्या संशयावरून एकास अटक
मुंबई गुन्हे शाखेच्या गुप्तचर पथकाची कारवाई; दोन मोबाइल, डायरी जप्त; पाकिस्तानातील व्यक्तीशी संपर्काचा तपास
सातारा : धमकीच्या एका प्रकरणाचा तपास करताना महाबळेश्वर-पाचगणी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीचे पाकिस्तानातील व्यक्तींशी संशयास्पद संबंध असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन (वय ३९, रा. महाबळेश्वर) याला मुंबई गुन्हे शाखेच्या गुप्तचर पथकाने अटक केली आहे. त्याचे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मुंबईतील वांद्रे (पूर्व) परिसरातील एका अनधिकृत मशिदीवर झालेल्या कारवाईला प्रसिद्ध व्यावसायिक इम्तियाज खत्री यांनी पाठिंबा दर्शविल्यानंतर त्यांना २१ मेपासून आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून धमकीचे दूरध्वनी व संदेश येत होते. याबाबत त्यांनी २२ जून रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा तपास करताना पोलिसांनी धमकी देणाऱ्या संशयिताचा माग काढला.
तपासादरम्यान धमकीचे दूरध्वनी व संदेश शफीक याच्या मोबाइलमधून पाठविल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले. शफीक गेल्या चार वर्षांपासून महाबळेश्वर-पाचगणी परिसरात राहत असून, एका हॉटेलमध्ये केअरटेकर म्हणून काम करत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
पाकिस्तानी व्यक्तीशी समाजमाध्यमातून संपर्क
चौकशीदरम्यान शफीकचा ‘फैयाज काश्मिरी’ नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीशी समाजमाध्यमातून संपर्क असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच त्याच्या काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाइल फोन आणि एक डायरी जप्त केली आहे.
मोबाइलमधील काही मजकूर व संभाषणे हटविण्यात आल्याचेही तपासात आढळले आहे. हटविलेला डेटा पुन्हा प्राप्त करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेतली आहे. या डिजिटल तपासातून पाकिस्तानातील व्यक्तींशी शफीकचे नेमके कोणत्या स्वरूपाचे संबंध होते, तसेच त्याचा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी थेट संबंध आहे का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
६ सप्टेंबरला महाबळेश्वरात पथक दाखल
शफीक महाबळेश्वरमध्ये राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे गुप्तचर पथक ६ सप्टेंबर रोजी महाबळेश्वरमध्ये दाखल झाले. त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आणि पुढील तपासासाठी मुंबईला नेण्यात आले.
सध्या त्याच्या मोबाइलमधील संभाषणे, समाजमाध्यमांवरील संपर्क, आर्थिक व्यवहार तसेच जप्त केलेल्या डायरीतील नोंदींची सखोल छाननी सुरू आहे. या तपासातून धमकीच्या प्रकरणामागील संपूर्ण नेटवर्क तसेच संशयिताचे पाकिस्तानातील व्यक्तींशी असलेले संबंध स्पष्ट होणार आहेत.
दरम्यान, शफीकचे दहशतवादी संघटनेशी थेट संबंध असल्याचे अद्याप पोलिस तपासातून सिद्ध झालेले नसून, या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.





















