थायलंडमध्ये सृष्टी जाधवची तलवारबाजीत कांस्य भरारी!
आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पदक; वरखडवाडीच्या कन्येच्या यशाची दैदीप्यमान नोंद
वाई l प्रतिनिधी : वाई तालुक्यातील वरखडवाडी येथील कु. सृष्टी ज्ञानेश्वर जाधव हिने थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत महिला ईपी (Epee) प्रकारात कांस्यपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सांघिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देत सृष्टीने सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
सृष्टीचा हा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झाला आहे. बालपणीच वडिलांचे निधन झाल्यानंतर तिच्या आईने कष्ट करून तिचे संगोपन केले. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीसाठी तिच्या मामानेही मोलाचा आधार दिला. आर्थिक अडचणी आणि विविध संकटांवर मात करत सृष्टीने तलवारबाजीच्या सरावावर सातत्याने लक्ष केंद्रित केले.
राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे प्रशिक्षक प्रफुल्ल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तिने नियमित सराव व प्रशिक्षण घेतले. मेहनत, जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्याच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत कांस्यपदकाची कमाई केली.
सृष्टीने यापूर्वीही आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली आहे. ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत कांस्य, सीनियर नॅशनल स्पर्धेत कांस्य आणि सीनियर स्टेट स्पर्धेत सुवर्णपदक तिने पटकावले आहे. तसेच अमरावती येथे सुरू असलेल्या ज्युनिअर स्टेट स्पर्धेतही तिने रौप्यपदक मिळवले आहे. त्यामुळे तिच्या पदकांची यशस्वी मालिका सुरूच असून भविष्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठे यश मिळवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सृष्टीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वरखडवाडी येथे झाले. त्यानंतर तिने किसन वीर कनिष्ठ महाविद्यालय, वाई येथे शिक्षण घेतले. सध्या ती पुणे येथील भारती विद्यापीठात शिक्षण घेत असून शिक्षण आणि क्रीडा कारकिर्दीची सांगड घालत आहे.
थायलंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणाऱ्या सृष्टीच्या या यशामुळे वरखडवाडी, वाई तालुका तसेच सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या जिद्दीच्या आणि संघर्षमय वाटचालीच्या या दैदीप्यमान यशाबद्दल विविध स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.





















