Sat, Sep 12, 2026
प्रशासन

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय कामकाजातील AI तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रशिक्षण संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय कामकाजातील AI तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रशिक्षण संपन्न
Ashok Ithape
  • PublishedSeptember 12, 2026

सातारा दि.११ -महसूल विभागाच्या प्रशासकीय कामकाजात गतीमानता, अचूकता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वापराबाबत विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी, सातारा यांच्या सूचनेनुसार शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले.

या प्रशिक्षणामध्ये उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ४) अभिषेक देशमुख यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले. प्रशासकीय कामकाजामध्ये AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध शासकीय प्रकल्प व टिपण्णींचे मसुदे तयार करणे, माहितीचे विश्लेषण व संकलन, अहवाल तयार करणे तसेच दैनंदिन कार्यालयीन कामकाज अधिक जलद व अचूक करण्यासाठी उपलब्ध AI साधनांचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणास उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, तहसीलदार शशिकांत जाधव यांच्यासह महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक तसेच ग्राम महसूल संवर्गातील एकूण १६० अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आधुनिक तंत्रज्ञानाचा जबाबदारीपूर्वक आणि प्रभावी वापर केल्यास प्रशासकीय कामकाजाची गुणवत्ता, अचूकता व कार्यक्षमता वाढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रशिक्षणास उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!