कवयित्री डॉ.योगिता राजकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
![]()
फलटण येथे प्राथमिक शिक्षाधिकारी अनिस नायकवडी यांच्या हस्ते डॉ राजकर यांचा गौरव
वाई / प्रतिनिधी : महाराजा मंगल कार्यालय फलटण येथे जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी आयोजित डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती अर्थात शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर २०२६ रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.यात देणार येणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जिल्हा परिषद आदर्श शाळा बोपर्डी येथील शिक्षिका डॉ. योगिता अरविंद राजकर यांना प्राप्त झाला आहे. फलटण येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित समारंभात माननीय प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांच्या हस्ते आणि अध्यक्ष जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी, सातारा जिल्हा परिषद सदस्य मा.सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम, मा. गटशिक्षणाधिकारी सी. जी.मठपती पंचायत समिती फलटण यांच्या उपस्थितीत ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ सन्मानपूर्वक देण्यात आला.याच वेळी शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या शिक्षणव्रतींचा आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात आले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.
साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रात डॉ.योगिता राजकर यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला माननीय सह्याद्री चिमणराव कदम, माननीय शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, विषय तज्ञ दमयंती कुंभार बँकेचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर,संभाजी कदम,तुकाराम कदम,शहाजी जाधव,अरविंद राजकर तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटी मधील शिक्षक,प्राथमिक शिक्षक,सेवानिवृत्त शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी उपस्थित होते.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक अभिरुची निर्माण करणाऱ्या प्रयोगशील शिक्षिका म्हणून डॉ. योगिता राजकर यांना ओळखले जाते. त्या स्वतः कविता,ललित लेखन,बालसाहित्य लिहितात.त्यांची चैत्रचाहूल,बाईपण हे दोन कवितासंग्रह मंतरधून हा ललित लेखसंग्रह प्रकाशित झाले असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कला जोपासू या शाळेची आवड रुजवू या नवोपक्रमास महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचा शोधनिबंध पुरस्कार मिळाला असून विविध संस्थांनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
क कमाल ध धमाल कार्यक्रमाची निर्मिती व लेखन त्यांनी केले असून आकाशवाणी सातारा येथे विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत.वाचन संस्कृती रुजवण्यासाठी रोज वाचण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये रुजवत लिहिण्याची प्रेरणाही त्या विद्यार्थ्यांना देतात.यातून विद्यार्थी कविता, अनुभवकथन,पुस्तक परीक्षण,गोष्टी,संवाद लिहित असून दिवाळी अंक तसेच स्पंदने शिक्षणाची यातून हे साहित्य सातत्याने प्रकाशित होत आहे.विविध स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचे विद्यार्थी अग्रेसर असतात. सदर पुरस्काराबद्दल
सर्व क्षेत्रातून डॉ. योगिता राजकर यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





















