NCMC कार्ड सक्तीला तात्पुरती शिथिलता; ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांना मोठा दिलासा
नोंदणी पावतीच्या आधारे सवलतीच्या मॅन्युअल तिकिटावर प्रवासाची मुभा; गणेशोत्सवातील ग्रुप बुकिंगलाही NCMC सक्ती नाही
वाई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेत ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी लागू करण्यात आलेल्या NCMC कार्ड सक्तीमुळे निर्माण झालेल्या अडचणींची दखल घेत महामंडळाने तात्पुरती शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे NCMC कार्ड अद्याप प्राप्त न झालेल्या तसेच काही विशिष्ट प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.
ऑनलाईन तिकीट आरक्षित करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना NCMC कार्ड अनिवार्य न करता, आरक्षित तिकिटावर नियमानुसार सवलतीच्या दरात प्रवास करण्याची अनुमती देण्यात आली आहे. तसेच NCMC कार्डसाठी नोंदणी केली आहे; मात्र अद्याप कार्ड प्राप्त झालेले नाही, अशा लाभार्थ्यांना नोंदणीची पावती ग्राह्य धरून सवलतीच्या मॅन्युअल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत देण्यात आली आहे.
विशेष बससेवांनाही सवलत लागू
प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सुरक्षित व सुलभ धार्मिक पर्यटन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संडे पर्यटन’ योजना सुरू केली आहे. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर तीर्थाटनासाठी विभागामार्फत विशेष बसेस चालविण्यात येत आहेत. १२ सप्टेंबर २०२६ पर्यंत या विशेष बसेसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना पूर्वीच्या कार्यपद्धतीनुसार सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गणेशोत्सवातील ग्रुप बुकिंगलाही NCMC सक्ती नाही
गणेशोत्सवासाठी करण्यात आलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या ग्रुप बुकिंगमधील ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांनाही NCMC कार्ड सक्ती न करता, आरक्षित तिकिटावर नियमानुसार सवलतीच्या दरात प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, ज्या लाभार्थ्यांकडे Active NCMC कार्ड आहे, त्यांना त्याच कार्डद्वारे सवलतीचे तिकीट देण्यात यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्व्हरवरील वाढलेल्या ‘Hits’ मुळे अडचणी
१ सप्टेंबर २०२६ पासून NCMC कार्ड अनिवार्य केल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढल्याने सर्व्हरवरील ‘Hits’ वाढले. परिणामी ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना सवलतीची तिकिटे देताना तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. यामुळे प्रवाशांच्या तक्रारी वाढल्यानंतर महामंडळाने काही बाबतीत तात्पुरती शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाची माहिती सर्व आगार व्यवस्थापक, वाहक व चालकांना देऊन त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या तारखा
३० सप्टेंबर २०२६ पर्यंत :
NCMC नोंदणीची पावती दाखवून सवलतीच्या मॅन्युअल तिकिटावर प्रवासाची मुभा.
१२ सप्टेंबर २०२६ पर्यंत :
विशेष बससेवांमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना सवलत लागू.





















