Sat, Sep 5, 2026
पर्यावरण

कास फुलोत्सवासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू; १ सप्टेंबरपासून पर्यटकांना प्रवेश

कास फुलोत्सवासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू; १ सप्टेंबरपासून पर्यटकांना प्रवेश
Ashok Ithape
  • PublishedAugust 29, 2026

सातारा, ता. २८ : जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कास पुष्प पठाराचा यंदाचा फुलोत्सव हंगाम १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. फुलोत्सवासाठी पर्यटकांना www.kas.ind.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. विशेषतः शनिवार, रविवार आणि सरकारी सुटीच्या दिवशी ऑनलाइन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार असून, थेट येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही.

कास पठारावर सध्या चवर फुलांचा बहर दिसू लागला असून, अन्य फुलांच्या प्रजातीही तुरळक प्रमाणात उमलल्या आहेत. नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी १२ वर्षांवरील पर्यटकांसाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या शुल्कामध्ये पार्किंगपासून कास पठारापर्यंत बससेवा मोफत राहणार आहे. प्रत्येक ग्रुपला माहितीपत्रिका देण्यात येणार असून, एकीव वॉच टॉवरवरील दुर्बिणीतून कण्हेर जलाशय व परिसराचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. कुमुदिनी तलाव वॉच टॉवरवरून कास तलाव परिसराचे दर्शन घेता येणार आहे.

कुमुदिनी तलावापर्यंत इलेक्ट्रिक वाहनातून ये-जा करण्यासाठी प्रतिव्यक्ती १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शनिवार, रविवार व इतर सुटीचे दिवस वगळता शालेय सहलींसाठी प्रतिविद्यार्थी ४० रुपये शुल्क राहणार असून, त्यासाठी संबंधित शाळेच्या प्राचार्यांचे पत्र आवश्यक आहे.

पर्यटकांना कास परिसराची माहिती देण्यासाठी गाइडची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. किमान दहा जणांच्या ग्रुपसाठी एका तासासाठी २०० रुपये गाइड शुल्क आकारले जाणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज ऑनलाइन प्रवेशाची कमाल मर्यादा तीन हजार पर्यटक निश्चित करण्यात आली आहे.

मंडपघळ ठरणार नवे पर्यटन आकर्षण

कास पठाराच्या पर्यटनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी परिसरातील अन्य नैसर्गिक स्थळांकडेही पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंदाच्या हंगामात मंडपघळ हे प्रमुख पर्यटन आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. दऱ्याखोऱ्यांचे विहंगम दृश्य, निसर्गसौंदर्य आणि जैवविविधतेमुळे मंडपघळ पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहे.

पर्यटन केवळ कास पठारापुरते मर्यादित न राहता परिसरातील अन्य नैसर्गिक स्थळांपर्यंत पोहोचावे, यासाठी मंडपघळचा समावेश करण्यात येत असल्याची माहिती कास संवर्धन समितीचे उपाध्यक्ष प्रदीप कदम यांनी दिली.

कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांनी माहितीपत्रिकेतील सूचनांचे पालन करून फुलांचे संवर्धन आणि परिसराची स्वच्छता राखावी, असे आवाहन सातारा वनविभाग आणि कास पठार सहा गाव संवर्धन समितीने केले आहे.

प्रवेश व सुविधांचे दर :

  • १२ वर्षांवरील पर्यटक : २०० रुपये
  • शालेय सहल : ४० रुपये प्रतिविद्यार्थी
  • गाइड : २०० रुपये प्रतितास
  • इलेक्ट्रिक वाहन : १०० रुपये प्रतिव्यक्ती
  • दैनिक ऑनलाइन प्रवेश मर्यादा : ३,००० पर्यटक
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!