राखीतून देशप्रेम, पर्यावरणप्रेम अन् उद्योजकतेचा धडा!
द्रविड हायस्कूलमध्ये ‘एक राखी सैनिकासाठी’, वृक्षांना राखी आणि ‘राखी विक्रीतून स्वकमाई’ उपक्रम उत्साहात
वाई : डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित द्रविड हायस्कूल, वाई येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, देशप्रेमाला आणि उद्योजकतेला चालना देणारे विविध उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. ‘एक राखी सैनिकासाठी’, ‘वृक्षांना राखी बांधून पर्यावरण संरक्षणाची शपथ’ आणि ‘राखी विक्रीतून स्वकमाई’ या उपक्रमांना विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
५०० राख्या सीमेवरील जवानांसाठी
‘एक राखी सैनिकासाठी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. भारताच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी तब्बल ५०० राख्या तयार केल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी भावनिक संदेशही लिहिले. ‘आपण देशाच्या सीमेचे रक्षण करता म्हणून आम्ही बिनधास्तपणे आपले सण साजरे करू शकतो. आपल्या त्यागाची परतफेड कोणत्याही भेटवस्तूने होऊ शकत नाही,’ अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
शाळेचे NCC ऑफिसर श्री. महेश इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली २२ महाराष्ट्र बटालियन NCC, सातारा येथील NCO हवालदार नारायण गोळे यांना विद्यार्थीनींनी प्रातिनिधिक स्वरूपात राखी बांधली. त्यानंतर सीमेवरील सैनिकांना पाठविण्यासाठी ५०० राख्या शालेय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आल्या.
वृक्षांना राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
शाळेतील शिक्षिका सौ. विद्या मर्ढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट-गाईड अंतर्गत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या वृक्षांना बांधण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम, संवेदनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यात आली.
राखी विक्रीतून विद्यार्थ्यांनी शिकले व्यवहाराचे धडे
व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘राखी विक्रीतून स्वकमाई’ हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेल्या आकर्षक राख्यांचे ढवळीकर सभागृहात प्रदर्शन व विक्री करण्यात आली. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी ग्राहक म्हणून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने ग्राहकांशी संवाद साधत राख्यांची विक्री केली. या प्रत्यक्ष व्यवहारातून विक्रीतून मिळणारी रक्कम, झालेला खर्च, नफा तसेच ग्राहकांना दिली जाणारी सवलत यांचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले. काही विद्यार्थ्यांनी नफा मिळाल्यानंतरही ग्राहकांना सवलतीच्या दरात राख्या विकून व्यवहारकौशल्यासोबत सामाजिक जाणीव आणि उद्योजकतेचा सुंदर समन्वय साधला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, आर्थिक शिस्त, नियोजन, विक्रीकौशल्य, संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि उद्योजकतेची भावना विकसित झाली.
या उपक्रमाचे नियोजन व राखी तयार करण्याचे मार्गदर्शन श्री. महावीर कुपाडे यांनी इतर शिक्षकांच्या सहकार्याने केले.
उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय भोसले, उपशालाप्रमुख सौ. नेत्रा मुळे आणि पर्यवेक्षक श्री. घनःश्याम नवले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन देणारे शालेय समितीचे अध्यक्ष श्री. नितीन पोरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
एकंदरीत, द्रविड हायस्कूलमधील या उपक्रमातून देशप्रेम, पर्यावरणप्रेम आणि उद्योजकतेचे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर रुजविण्यात आले. ‘शिकता शिकता कमवा आणि उद्योजकतेची बीजे रुजवा’ या संकल्पनेला या उपक्रमातून कृतीशील आणि प्रेरणादायी प्रतिसाद मिळाला.
फोटो ओळ : सीमेवरील सैनिकांना शाळेकडून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या सुपूर्त करताना.





















