‘वॉक फॉर वॉटर’मधून जलसंधारणाचा जागर; अभिनेता संजय दत्त होणार सहभागी
मुंबई : प्रतिनिधी
माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’ या राज्यव्यापी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांना निमंत्रित केले असून, त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.
जलसंधारणाचा संदेश अधिक व्यापक स्तरावर पोहोचावा आणि ‘महा वॉकेथॉन’चे रूपांतर लोकचळवळीत व्हावे, या उद्देशाने लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, कलाकार, खेळाडू, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येत आहे.
‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश घेऊन राज्यभर हा वॉकेथॉन उपक्रम राबविण्यात येणार आहे. जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन आणि मातीचे संरक्षण याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
दरम्यान, १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. तसेच १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांना लोकसहभागाची जोड देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
राज्यातील प्रत्येक नागरिकाने जलसंधारणाची जबाबदारी स्वीकारून या लोकचळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





















