केबल जाळून तांबे विक्रीचा डाव फसला; वाईत दोघे पोलिसांच्या जाळ्यात
वाई पोलिसांची कारवाई; १०० मीटर कॉपर केबल चोरीचा गुन्हा उघडकीस
वाई : प्रतिनिधी — शेतीपंपाची केबल चोरून ती जाळून त्यातील तांबे विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना वाई पोलिसांनी पसरणी रोड परिसरातून ताब्यात घेतले. संशयितांकडून तांब्याची तार जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे १०० मीटर केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
वाई येथील एका सोसायटीच्या पार्किंगमधून सुमारे १०० मीटर लांबीची निळ्या रंगाची २.५ एमएम जाडीची तीन फेज कॉपर केबल चोरीला गेल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.
शेतीपंपांच्या केबल चोरीचे प्रकार लक्षात घेऊन गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपासाला वेग दिला. बातमीदारांकडून मिळालेली माहिती तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेत असताना, दोन जण तांब्याची तार विक्री करण्यासाठी पसरणी रोड परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिस पथकाने पसरणी रोड परिसरात सापळा रचून दोघांना तांब्याच्या तारेसह ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी चोरीची केबल जाळून त्यातील तांबे विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले.
या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, केबल चोरीच्या या प्रकारामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच चोरीच्या मालाची विक्री कुठे केली जात होती, याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक अमित सुर्वे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली.





















