Fri, May 29, 2026
Close

Recent Posts

सामाजिक

“समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा आदर्श युवकांनी घ्यावा” उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांचे प्रतिपादन;

“समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींचा आदर्श युवकांनी घ्यावा” उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांचे प्रतिपादन;
Ashok Ithape
  • PublishedMay 8, 2026

ॲड. अनिलकुमार सुकटे यांचा ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव

वाई : समाजामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आदर्श युवा पिढीने घेतला पाहिजे. अशा व्यक्तींच्या कार्यातून युवकांना संस्कार, दिशा आणि प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी केले.

कुसगाव (ता. वाई) येथे श्री वाघजाई देवी व इतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सातारा येथील ऍड. अनिलकुमार सुकटे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी सरपंच सीमा वरे, ह.भ.प. प्रवीण चव्हाण, बाजीराव वरे, संजीव वरे, सतीश हगवणे, शामराव घाडगे, शिवाजी वरे, रामदास हगवणे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव वरे आदी मान्यवर उपस्थित होते.

सुनील साळुंखे पुढे म्हणाले की, पालकांनी आपल्या मुलांच्या संगतीकडे आणि त्यांच्या दैनंदिन वर्तनाकडे लक्ष दिले पाहिजे. चांगले शिक्षण व संस्कार दिल्यास युवक योग्य मार्गावर राहू शकतात. सध्या समाजात घडणाऱ्या विविध वाईट घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याचा देवस्थान ट्रस्टचा उपक्रम प्रेरणादायी आहे.

यावेळी ऍड. अनिलकुमार सुकटे यांनी विविध जनहित कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीव वरे यांनी केले तर आभार जितेंद्र गोळे यांनी मानले. कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिक, महिला, युवक व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी : ऍड. अनिलकुमार सुकटे यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान करताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, ह.भ.प. प्रवीण चव्हाण, सदाशिव वरे, संजीव वरे व मान्यवर.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!