ज्ञानसाधनेतून घडले असामान्य व्यक्तिमत्त्व; डॉ. ॲड. भाग्यश्री दुधाडे यांच्या बहुआयामी कर्तृत्वाचा देशपातळीवर गौरव
![]()
प्राचार्य, संशोधक, लेखिका, विधिज्ञ आणि समाजसेविका म्हणून राज्य-राष्ट्रीय स्तरावर ठसा; एलएलबीमध्ये प्रथम श्रेणीसह विशेष प्राविण्य, अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव
पुणे, प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्व, संशोधनातील भरीव योगदान, सामाजिक बांधिलकी आणि ज्ञानार्जनाची अखंड साधना यांचा संगम असलेल्या प्राचार्य तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. ॲड. भाग्यश्री अरविंद दुधाडे यांनी आपल्या बहुआयामी कार्यातून शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मूळच्या मांढरदेव येथील आणि श्री. संपतराव मांढरे यांच्या कन्या असलेल्या डॉ. दुधाडे यांनी नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची एलएलबी पदवी प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह संपादन करून आपल्या शैक्षणिक यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. दुधाडे यांनी पीएचडी, एम.एस्सी., एम.एड., एमबीए, एमए (सायकोलॉजी), एमए (इंग्रजी), बी.एड., पीजीडीबीए यांसह अनेक पदव्या प्रथम श्रेणीत संपादन केल्या असून त्या यूजीसी-नेट पात्र आहेत. सध्या त्या स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे येथे प्राचार्य व सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
संशोधन क्षेत्रात ५१ संशोधन निबंध प्रकाशित करणे, ४३ संशोधनपत्रांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरीकरण करणे, तसेच पीएचडी संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्य करणे ही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. शिक्षक शिक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त ठरलेली अनेक पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली आहेत.
सामाजिक क्षेत्रात तपस्या फाउंडेशनच्या संचालक आणि कल्पवृक्ष फाउंडेशनच्या खजिनदार म्हणून त्या विविध उपक्रम राबवत असून ‘अभिनव कन्या शैक्षणिक पालकत्व योजना’ अंतर्गत दरवर्षी एका मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून सामाजिक बांधिलकी जपत आहेत.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना National Best Principal Award 2025, Vidya Ratna National Award 2024, Best Teacher Award यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
ज्ञान, गुणवत्ता, नेतृत्व आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर मिलाफ असलेल्या डॉ. ॲड. भाग्यश्री दुधाडे यांची यशोगाथा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.





















