मुलासोबत आईच्या कष्टाचेही सार्थक
![]()
आईचे बारावीच्या तर मुलाचे दहावीच्या परीक्षेत यश
भुईंज : पिराचीवाडी, आसले ता. वाई येथील माय लेकरानी एकाच वर्षी बारावी आणि दहावीच्या परीक्षेत यश मिळवले आहे. आईने सतरा वर्षानंतर पुन्हा वह्या पुस्तके उघडुन बारावीच्या परीक्षेत यश मिळवले असताना मुलानेही दहावीच्या परीक्षेत उत्तम गुणांनी पास होत आईच्या यशात आनंदाची भर टाकली.
सौ. ज्योती संजय माटे असे या आईचे नाव असून त्यांनी आठ दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत यश संपादन केले. तर त्यांचा मुलगा सार्थक संजय माटे याने सोमवारी जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होत आईचा आनंद द्विगुणित केला आहे.
सौ. ज्योती माटे यांची शाळेची सोबत सोडून अठरा वर्ष उलटली होती. आपण बारावी तरी पास व्हायला पाहिजे होते असे त्यांना कायम वाटत असे. बघता बघता मुलगा दहावीच्या वर्गात गेला आणि त्यांनीही जिद्दीने यंदा बारावीच्या परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्धार केला.
विशेष म्हणजे शिरवळ येथील खासगी कंपनीतील नोकरी तसेच घरातील सर्व जबाबदारी पार पाडून ज्योती माटे यांनी जिद्दीने अभ्यास करून बारावीच्या परीक्षेला त्या आत्मविश्वासाने सामोऱ्या गेल्या. त्यांच्या मेहनतीला फळ आले. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्यांनी यशस्वी कामगिरी केली. त्यांच्या या आनंदात मोठी भर टाकली ती त्यांचा मुलगा सार्थक याने. त्यानेही दहवीच्या परिक्षेत उत्तम गुण मिळवले.
बारावी आणि दहावीच्या परीक्षेत एकाच वर्षी यशस्वी होण्याचा आगळा वेगळा पराक्रम या माय लेकरांनी केला असून त्याबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.













