पेढ्याचा भैरोबा परिसराचे हायटेक सुशोभीकरण…दोन डोंगर जोडणारा आयकॉनिक ब्रीज ठरणार लक्षवेधी
![]()
आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून तब्बल १२ कोटी खर्चाचा प्रकल्प लागणार मार्गी
भुईंज : महेंद्रआबा जाधवराव
ऐतिहासिक आणि नैसर्गिक श्रीमंती असलेल्या साताऱ्याची महती वाढविणारे आता पेढ्याचा भैरोबा मंदिर परिसराचे आकर्षक सुशोभीकरण कामास सुरुवात झाली आहे. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून तब्बल १२ कोटी खर्चाचा हा प्रकल्प असून शासन आणि नगरपरिषद निधीतून तो पुर्ण केला जाणार आहे. यात पर्यटकांना भुरळ घालणारा आयकॉनिक ब्रीज, ॲपी थिएटर, व्हिहींग गार्डन लक्षवेधी ठरणार असून येत्या दिड वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. याबद्दल भैरोबा भक्तांसह याठिकाणी नियमित येणाऱ्या करंजे, शाहुपुरी, सातारकरांना हा प्रकल्प लवकर पुर्ण व्हावा याची उत्सुकता लागली आहे.
सातारकरांचे श्रध्दास्थान आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या पेढ्याचा भैरोबा मंदिराचा जीर्णोद्धार आणि परिसराचे सुशोभीकरण काम सुरू झाले आहे. तब्बल १२ कोटींचा हा प्रकल्प असून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून शासकीय निधी त्याला नगरपरिषदेच्या माझी वसुंधरा योजनेची जोड देऊन हायटेक सुशोभीकरण येत्या दिड वर्षात पुर्ण होणार आहे. याठिकाणी पक्षांचा विचार करून आणि सौंदर्यांची भूरळ वाढवणारी १५ हजार स्वदेशी वृक्षलागवड आणि संगोपनासाठी स्वतंत्र ठेकेदार असणार आहे.

मंदिर परिसरात भव्य योगा हॉल, दोन खुली व्यासपीठ, सातारचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ३ उंच स्पॉट, वृक्ष संगोपनासाठी ७५ हजार लिटर पाण्याची टाकी, जॉगिंग ट्रॅक होणार आहे.तर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जणू हवेतून चालण्याचा आनंद अनुभूती येईल असा दोन डोंगर जोडणारा आकर्षक आयकॉनीक ब्रीज असणार आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यासाठी शासकीय निधी उपलब्ध करून दिला आहे.तर नगरपरिषदेने सुशोभीकरणासाठी विशेष तरतूद करत साताऱ्याची नैसर्गिक महती वाढविण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. यासाठी आवश्यक सर्व परवानग्या घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून माजी जिल्हा कृषी अधिक्षकांनी नगरपरिषदेला ग्लेरिशेड हि विषारी असलेल्या झाडांचे दुष्परिणाम घातक असून ती या मंदीर परिसरातून काढून टाकावीत, असे पत्र दिल्याने काही झाडे काढून टाकण्यात आली असल्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश
सातारच्या वैभवात भर टाकणारा या प्रकल्पासाठी अविनाश कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या प्रकल्पासाठी निधी मंजूर केला. या प्रकल्पाचे काम गुणवत्तापूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण असणार असल्याचे माजी नगरसेवक अविनाश कदम यांनी ‘संकल्प न्यूज’ शी बोलताना सांगितले.













