महिलांमधील कर्करोग निदानासाठी शनिवारी रोटरी आशा एक्सप्रेसचे लोकार्पण.
![]()
रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन स्वाती हेरकळ यांच्या प्रयत्नातून उपक्रमाचे आयोजन
वाई / प्रतिनिधी : समाजातील कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि महिलांमधील स्तन, ओरल व नाक – कान – घसा यातील कॅन्सरच्या निदान व उपचारासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून रोटरी आशा एक्सप्रेस या विशेष ॲम्बुलन्स बसचे नियोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमातील चार पैकी पहिल्या बसचे लोकार्पण येत्या शनिवारी (दि.११) कराडच्या कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येणार असल्याची माहिती रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकळ यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बदलती जीवनशैली, राहणीमान, व्यायामाचा अभाव व असेंद्रिय अन्नपदार्थांचा वापर यामुळे कर्करोगांच्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. विशेषत: महिलांमध्ये ब्रेस्ट ओरल, ई.एन.टी., गर्भाशय मुख आधी अवयवांचे कर्करोग मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. कॅन्सरचा शरीराबरोबरच मनावरही विपरीत परिणाम होत असल्याने संबंधित रुग्ण शारीरिक व मानसिक दृष्ट्या खचून जातो.
वेळेवर उपचार झाले किंवा प्राथमिक अवस्थेतच कॅन्सरचे निदान झाले तर संभाव्य मोठा धोका टाळता येऊ शकतो. मात्र लहान-मोठे दुखणे ही अंगावर काढणाऱ्या महिला कॅन्सरच्या निदानाबाबतही फारश्या गंभीर नसतात. एव्हाना चिकित्सा करून घेण्यासही त्या घाबरत असतात. त्याचा परिणाम म्हणून बऱ्याचदा अंतिम अवस्थेत असणाऱ्या कर्करोगाचे निदान होते व तोपर्यंत उपचाराची वेळ हातातून निघून गेलेली असते.

या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब तर्फे महिलांमधील कर्करोगाबाबत चिकित्सा, उपचार व निदान याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या पुढाकाराने चार चिकित्सा ॲम्बुलन्स बस निर्माण करण्यात आल्या आहेत. विशेषत: दी रोटरी फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ वाई, रोटरी क्लब ऑफ वॉलसोल (अमेरिका), रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 (भारत), 1220, 1210, 1200, 1145, 1080 (अमेरिका) तसेच रोटरी क्लब अकलूज व कराड यांनी केलेल्या अर्थसाहाय्यातून महिलांवरील कर्करोगाचे निदान व उपचार करणाऱ्या रोटरी आशा या चार बस कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
Women’s Health on Wheels या ग्लोबल ग्रँट च्या माध्यमातून सातारा जिल्हा आणि परिसरातील 1000 गावांसाठी ही Cancer Screening & Awareness Ambulance Bus उपलब्ध करण्यात येत आहे.
चार पैकी पहिल्या बसचे लोकार्पण येत्या शनिवारी, दि. 11 मे रोजी कराडच्या कृष्णा वैद्यकीय विश्वविद्यालयात करण्यात येणार आहे. ही सर्व सुविधायुक्त रोटरी आशा एक्सप्रेस ॲम्बुलन्स बस उपलब्ध करण्यासाठी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकळ यांनी सातत्याने विशेष प्रयत्न केले असून हा उपक्रम कार्यान्वित होत असल्याने अनेक महिलांसाठी कर्करोग चिकित्सा सुविधा त्यांच्या घरालगतच उपलब्ध होणार आहे.
ठिकठिकाणी ही बस नेण्यात येऊन कॅन्सर अवेअरनेस प्रोग्रॅम राबवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून महिलांच्या विविध अवयवांचे स्क्रीनिंग करण्यात येईल व वेळेवर उपचार करून संभाव्य गंभीर धोके रोखण्यात येतील. त्या दृष्टीने ही रोटरी आशा एक्सप्रेस उपयुक्त ठरेल, असे रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. सामाजिक बांधिलकीतून रोटरी क्लब तर्फे हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.













