Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र सामाजिक

पहिली पास आणि मोबाईल ॲपचा गंध नसलेल्या प्रगणकाने सर्वेक्षणाचे तीन तेरा वाजवल्याने मराठा समाजाच्या मागासपणाच्या सर्वेक्षणाचा बट्ट्याबोळ

पहिली पास आणि मोबाईल ॲपचा गंध नसलेल्या प्रगणकाने सर्वेक्षणाचे तीन तेरा वाजवल्याने मराठा समाजाच्या मागासपणाच्या सर्वेक्षणाचा बट्ट्याबोळ
Ashok Ithape
  • PublishedJanuary 25, 2024

अशिक्षित प्रगणक, शिक्षकांचा बहिष्कार तर सर्व्हर डाऊनच्या अडचणींमुळे सर्वेक्षणाचा उडाला फज्जा.!

भुईंज । महेंद्रआबा जाधव :

हे आमचे काम नव्हे ! असे सांगत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शिक्षकांनी मराठा समाजच्या मागासपणाचे सर्वेक्षण करण्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नकाराचे हे लोण हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पसरण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ३१ जानेवारीपूर्वी सर्वेक्षण कसे पूर्ण होणार? असा नवाच पेच निर्माण होण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.

मराठा समाजाच्या मागासपणाचे सर्वेक्षण करण्याचे अध्यादेश राज्य सरकारने दिले असून ३१ जानेवारीपूर्वी हे सर्वेक्षण करण्यात यावे असे सरकारी अध्यादेशात म्हटले आहे. त्याची जबाबदारी शिक्षण तसेच आरोग्य आणि महसूल विभागावर सोपवण्यात आली आहे. मात्र काम शाळाबाह्य अर्थात अशैक्षणिक असल्याचा आक्षेप घेत शिक्षकांनी या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकला आहे.

मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली आहे. एका शिक्षकास शंभर कुटुंबांची १८५ प्रश्न असलेली प्रश्नावली ३१ जानेवारीच्या पूर्वी भरून द्यायची आहे. दरम्यानच्या काळात प्रजासत्ताकदिन तसेच रविवारची सुटी देखील आहे. शिक्षकांच्या मते एका कुटुंबाचा अर्ज भरण्यासाठी पाउण तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे शाळेतील अध्यापन बंद करून सर्वेक्षण करावे लागेल. मग याकाळात शाळा पूर्ण बंद ठेवायच्या काय, असा सवाल करत वर्धा जिल्हा शिक्षक तक्रार निवारण शक्यता आहे.

केवळ पहिली पास झालेल्या केडगाव येथील प्रगणकाचा सर्वेक्षण कामाबाबत त्याने दिलेल्या माहीचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात सर्वत्र व्हायरल झाला आहे. असे असल्यास सरकार फक्त कसेही करा पण सर्वेक्षण काम उरका ह्याच पवित्र्यात दिसून येत असल्याने मराठा समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबईत तमिळ भाषिक सफाई कामगारांवर मराठा सर्वेक्षणाचे काम
मराठा समाजाच्या मागासपणाचे कामकाज किती ढिसाळ आणि निष्काळजीपणे होत आहे याचा एक नमुना मुंबई महानगरपालिकेने दाखवला आहे. मुंबई महानगरपालिकेने कर्मचारी, अभियंत्यांबरोबरच सफाई कामगारांनाही मराठा सर्वेक्षणाच्या कामाची जबाबदारी सोपविली असून निरक्षर असलेल्या तमिळ भाषिक सफाई कामगारांची या कामासाठी नियुक्ती केली आहे.

यामुळे सर्वेक्षणाचे काम योग्य पद्धतीने होईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  हरिजनकुमार आनंद, देवेंद्र मुत्तुस्वामी आणि देवेंद्र अरमुगम या तीन सफाई कामगारांना हे काम देण्यात आले आहे. हे तमिळ भाषिक असून त्यांना मराठी लिहिता, वाचता येत नाही. त्यामुळे ते या सर्वेक्षणाचे काम करताना अर्ज भरणे, मोबाइल ॲपचा वापर करणे ही कामे करू शकणार नाहीत. तरीही त्यांना ही कामे देण्यात आली आहेत. या कामगारांना तमिळ भाषेतून स्वतःची केवळ स्वाक्षरी करता येते. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला केवळ हे सर्वेक्षण उरकून टाकयचे आहे. ही कृती म्हणजे मराठा समाजाची सरळ सरळ फसवणूकच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!