Wed, Jun 17, 2026
कलाकार कट्टा

वाईच्या अमित बोबडे यांच्या लघुपटाची पूर्व युरोप चित्रपट महोत्सवात भरारी

वाईच्या अमित बोबडे यांच्या लघुपटाची पूर्व युरोप चित्रपट महोत्सवात भरारी
Ashok Ithape
  • PublishedJune 16, 2026

‘नजरेंचा खेळ’ला रोमानियात विशेष उल्लेखाचा मान; वडिलांच्या स्मृतीला अर्पण केलेला चित्रपट ठरला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवशाली

वाई प्रतिनिधी : वाई येथील युवा लेखक-दिग्दर्शक अमित विजयकुमार बोबडे यांच्या ‘नजरेंचा खेळ (स्टिलिंग ग्लासेस)’ या लघुपटाची जून महिन्यात रोमानिया येथे होणाऱ्या पूर्व युरोप चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली असून, या चित्रपटाला परीक्षकांकडून ‘विशेष उल्लेख’ हा सन्मानही प्राप्त झाला आहे.

यापूर्वीही या लघुपटाने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, हिमाचल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लेखक, उत्सव आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये ज्युरी सर्वोत्कृष्ट चित्रपट तसेच तामिळनाडू आणि बांगलादेशातील रिश्का फिल्म फेस्टमध्येही या चित्रपटाला गौरव मिळाला आहे.

पुरुषी अहंकार, संशय आणि आकर्षणातून निर्माण होणाऱ्या गैरसमजांवर भाष्य करणारी ‘नजरेंचा खेळ’ ही कथा प्रेक्षकांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडते. लेखक, दिग्दर्शक आणि संकलक म्हणून अमित बोबडे स्वतंत्र चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या या कलाकृतीने वाईचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे.

या लघुपटाचे तांत्रिक काम पुणे येथील एफटीआयआयमध्ये पार पडले आहे. चित्रपटाचे निर्माते म्हणून अमित यांचे वडील तथा निवृत्त नायब तहसीलदार स्व. विजयकुमार बोबडे यांनी जबाबदारी सांभाळली होती. मात्र चित्रपट निर्मितीदरम्यान त्यांचे आकस्मिक निधन झाले. या दुःखावर मात करत अमित यांनी लघुपट पूर्ण करून तो आपल्या वडिलांच्या स्मृतीस समर्पित केला.

युरोपमधील चित्रपट महोत्सवातील निवडीमुळे आता ‘नजरेंचा खेळ’ हा लघुपट आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर झळकणार असून, वाईच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!