Fri, Jun 19, 2026
सामाजिक

कोळी समाजाच्या जात व वैधता प्रमाणपत्रासाठी शासन निर्णय जाहीर करा; कोळी महासंघाचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोळी समाजाच्या जात व वैधता प्रमाणपत्रासाठी शासन निर्णय जाहीर करा; कोळी महासंघाचे सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Ashok Ithape
  • PublishedJune 19, 2026

सातारा, दि. १६ जून २०२६ (प्रतिनिधी) : अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील कोळी महादेव समाज बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे, तसेच रक्त नात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत २० ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी कोळी महासंघाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले.

कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अॅड. चेतनदादा पाटील यांच्या सूचनेनुसार हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य आण्णासाहेब कोळी, जिल्हाध्यक्ष अनिल केळगणे, जिल्हा युवाध्यक्ष तुषार शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा श्रीकुमारी कोळी यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मुंबई मंत्रालय येथे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २० ऑक्टोबर २०२३ रोजी कोळी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत राज्यस्तरीय बैठक झाली होती. या बैठकीत अनुसूचित जमाती प्रवर्गातील कोळी समाज बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटूनही संबंधित शासन परिपत्रक अद्याप जारी झालेले नसल्याची खंत महासंघाने व्यक्त केली आहे.

महासंघाच्या मते, संबंधित परिपत्रक जाहीर झाल्यास राज्यातील हजारो कोळी समाज बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. शिक्षण, नोकरी व विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
दि. १६ जून रोजी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री आणि संबंधित विभागांकडे शिफारस करून प्रलंबित परिपत्रक त्वरित काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी समाजाच्या न्याय्य मागण्यांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कोळी महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आण्णासाहेब कोळी यांनी व्यक्त केली.

जात व वैधता प्रमाणपत्राबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी
कोळी महासंघाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर करून २० ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करावी व कोळी समाजाच्या जात व जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भातील शासन परिपत्रक तातडीने जारी करावे, अशी मागणी करण्यात आली. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!