पोलीस स्मृतिदिनानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून अभिवादन
सातारा, दि.21 :
पोलीस स्मृतीदिनानिमित्त गेल्या वर्षभरात कर्तव्य बजावित असताना धारातिर्थी पडलेले देशभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी दि.1 सप्टेंबर 2022 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत कर्तव्यावर असताना शहिद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांचे वाचन करण्यात आले. तसेच यावेळी संपूर्ण पोलीस दलाने उभे राहून मानवंदना दिली.
त्यानंतर पोलीस दलाने बंदूकीच्या तीन फैरी झाडून व पोलीस बिगुल वाद्य वाजवून स्मृतीस्तंभास मानवंदना दिली. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.













