‘किसन वीर’च्या कामगारांचीही मकरंदआबांनी केली दिवाळी गोड!
दोन महिन्यांचे वेतन बँक खात्यावर जमा; कामगारांना ५ किलो साखरेचेही वाटप होणार – उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांची माहिती
वाई : प्रतिनिधी
किसन वीर आणि खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची दिवाळी साखर वाटप करून गोड केल्यानंतर आता कारखान्याच्या कामगारांनाही दिवाळीची भेट देण्यात आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील यांच्या पुढाकारातून दोन्ही कारखान्यांतील कामगारांना दोन महिन्यांचे वेतन देण्याचा तसेच प्रत्येकी पाच किलो साखर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
याबाबत अधिक माहिती देताना श्री. शिंदे म्हणाले की, किसन वीर कारखान्याच्या सभासद व बिगरसभासदांना गेल्या सात ते आठ वर्षांपासून बंद असलेले साखर वाटप पुन्हा सुरू करून नामदार मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील आणि संचालक मंडळाने शेतकऱ्यांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. त्याचबरोबर शेतकरी आणि कामगार ही कारखान्याची दोन महत्त्वाची चाके असल्याने कामगारांचाही दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार किसन वीर व खंडाळा या दोन्ही कारखान्यांतील कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन आज त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले असून, प्रत्येकी पाच किलो साखरेचेही वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान, किसन वीर आणि खंडाळा हे दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असून, संचालक मंडळाने निश्चित केलेले गाळप उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध वाटचाल सुरू आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी किसन वीर व खंडाळा कारखान्यांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले आहे.
नामदार मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील आणि संचालक मंडळाच्या वतीने सर्व सभासद, शेतकरी, कामगार व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या.





















