Wed, Oct 21, 2026
शिक्षण

भुईंजच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विविध उपक्रमांचा उत्साह; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!

भुईंजच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विविध उपक्रमांचा उत्साह; विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ!
Ashok Ithape
  • PublishedOctober 13, 2026

शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना; पर्यावरण संवर्धनासह सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न

कवठे, ता. १३ :

रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, भुईंज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शालेय आंतरवासिता टप्पा २’ अंतर्गत विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यात सर्जनशीलता, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबविण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, नागपंचमीनिमित्त मेहंदीचे कोन बनविण्याची कार्यशाळा, आनंददायी शनिवार, आठवडी बाजार, विज्ञान प्रदर्शन आणि चित्रांमध्ये रंगभरण स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कल्पकतेचे आणि कौशल्यांचे दर्शन घडविले. गोपाळकाला व पोषण सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैचारिक जागरूकता निर्माण करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक फुले तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी समूहगीत, सिंहगर्जना, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः बीजगोळे (सीडबॉल) तयार केले. या बीजगोळ्यांचा उपयोग वृक्षसंवर्धनासाठी करण्यात येणार आहे. याशिवाय, सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी परिसरातील ‘आपुलकी’ या विशेष मुलांच्या शाळेला सदिच्छा भेट दिली. या भेटीतून विद्यार्थ्यांना सामाजिक संवेदनशीलता, सहकार्य आणि माणुसकीची मूल्ये अनुभवता आली.

या संपूर्ण उपक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री. भैय्यासाहेब जाधवराव, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दीपक ढाणे, पर्यवेक्षिका सौ. विद्या आदलिंगे, समन्वयक श्री. व्ही. जे. नवले, आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या सौ. व्ही. एस. नलवडे, उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. धोंडगे, गट मार्गदर्शक डॉ. एस. एस. टेळे आणि आंतरवासिता विभागप्रमुख प्राध्यापक सौ. रवलेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि बी.एड. छात्र अध्यापक यांच्या सक्रिय सहभागातून हे उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!