Tue, Sep 29, 2026
क्राईम न्यूज

वाई परिसरात पिस्टल बाळगून दहशत माजवणारे दोघे गजाआड

वाई परिसरात पिस्टल बाळगून दहशत माजवणारे दोघे गजाआड
Ashok Ithape
  • PublishedSeptember 18, 2026

दोन देशी बनावटीचे गावठी पिस्टल, पाच जिवंत काडतुसे असा १ लाख ४० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोघांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

वाई : प्रतिनिधी

वाई परिसरात पिस्टल बाळगून दहशत माजविणाऱ्या दोन आरोपींना वाई पोलिसांनी धाडसी कारवाई करत अटक केली. सुदेश दीपक पाटणे आणि अक्षय विलास देसाई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून देशी बनावटीचे दोन गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख ४० हजार २५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास शेंदुरजणे गावच्या हद्दीत वाई-सुरूर रस्त्यावरील कॅनॉलजवळ एक युवक हातात पिस्टल घेऊन फिरत असून दहशत माजवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्या अधिपत्याखाली दोन पंचांसह पथक तयार करून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.

त्यानुसार पोलिसांनी दुपारी साडेबारा वाजल्यापासून शेंदुरजणे हद्दीतील कॅनॉल परिसरात सापळा रचला. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सुदेश दीपक पाटणे हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले.

पोलिसांनी सुदेश पाटणे याच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने हे पिस्टल स्वप्निल ऊर्फ सोन्या प्रदीप जगताप याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. तसेच अक्षय विलास देसाई यानेही स्वप्निल ऊर्फ सोन्या प्रदीप जगताप याच्याकडून एक पिस्टल घेतल्याची माहिती त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी अक्षय विलास देसाई याचा वाई परिसरात शोध सुरू केला. रात्री उशिरा अक्षय देसाई हा परखंदी रोड चौकात दिसून आला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी धाडसाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे आढळून आली. हा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सुदेश दीपक पाटणे आणि अक्षय विलास देसाई या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने २२ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत शिंदे, सोमनाथ टिके, विक्रम धोत्रे, विशाल शिंदे, नितीन कदम, हणमंत गाडे आणि महिला पोलीस नाईक प्रियांका कदम यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!