सतीश बाबर ‘आयएमए’च्या अध्यक्षपदी; मोतलिंग यांच्याकडे सचिवपदाची धुरा
वाई : प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वाई शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. सतीश बाबर, तर सचिवपदी डॉ. स्वप्निल मोतलिंग यांनी पदभार स्वीकारला. वाई शहरातील पदग्रहण कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी नगराध्यक्ष अनिल सावंत म्हणाले की, वाईकरांना दर्जेदार आणि चांगल्या वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आयएमए’ने पुढाकार घ्यावा. यासाठी नगरपालिका आवश्यक जागा तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करेल. तसेच डॉक्टर्स सदनच्या निर्मितीसाठीही पालिकेच्या माध्यमातून सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अरुण आदलिंगे यांनी वैद्यकीय व्यावसायिकांचा अनुभव, ज्ञान आणि कौशल्य हे रुग्णांसाठी मोठे वरदान असल्याचे सांगितले. ‘आयएमए’ ही केवळ डॉक्टरांची संघटना न राहता लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारी संघटना म्हणून कार्यरत राहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात उपाध्यक्षपदी डॉ. प्रशांत पोळ, खजिनदारपदी डॉ. सिद्धांत कद्दू, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. अर्चना लोखंडे, डॉ. समीर घोलप, डॉ. विराज येरामल्ला आणि डॉ. अभिषेक दबडे यांनी पदग्रहण केले.
यावेळी ‘आयएमए’च्या माजी अध्यक्षा डॉ. मंगला अहिवळे, तसेच डॉ. लता पाटील, डॉ. गजेंद्र पाटील, डॉ. उल्का कदम आणि डॉ. उल्का पोळ यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वाती देशपांडे यांनी केले, तर आभार डॉ. स्वप्निल मोतलिंग यांनी मानले. कार्यक्रमास नगरसेवक सचिन सावंत, शहरातील डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच वाईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : वाई येथे ‘आयएमए’च्या पदग्रहण कार्यक्रमात बोलताना डॉ. सतीश बाबर, नगराध्यक्ष अनिल सावंत, अरुण आदलिंगे व अन्य मान्यवर.





















