मराठी साहित्याची पताका अमेरिकेत; डॉ. जनार्दन भोसले यांना मानद डी.लिट.
साहित्य, पत्रकारिता, संशोधन व सामाजिक कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल; पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान
पुणे : प्रतिनिधी
मराठी साहित्य, पत्रकारिता, संशोधन, शिक्षण, सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रात बहुआयामी योगदान देणारे कवी, साहित्यिक, अभ्यासक, पत्रकार व समाजसेवक डॉ. जनार्दन भोसले यांना अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ लूशियाना यांच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ (D.Litt.) ही मानद पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. मराठी भाषा-साहित्य आणि सामाजिक बांधिलकीच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्राने घेतलेली दखल म्हणून या सन्मानाकडे पाहिले जात आहे.
पुणे या देशातील महत्त्वाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक नगरीत झालेल्या या गौरवामुळे डॉ. भोसले यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याला विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. आयपीएस अधिकारी, काश्मीरमधील शास्त्रज्ञ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना मानद डी.लिट. पदवीने सन्मानित करण्यात आले.
डॉ. जनार्दन भोसले यांनी मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्य केले आहे. साहित्यनिर्मिती, चिकित्सक लेखन, संशोधन, साहित्य संमेलने, पत्रकारिता आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात अधिक प्रभावी वापर व्हावा, भाषेचे मूळ सौंदर्य आणि अस्मिता जपली जावी, यासाठी ते सातत्याने जनजागृती करीत आहेत.
भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या ‘निधर्मीवाद’ या समीक्षात्मक ग्रंथाची महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात विशेष दखल घेण्यात आली. या ग्रंथाला २५ राज्यस्तरीय पुरस्कार आणि दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते. संशोधनपर लेखनाबरोबरच त्यांच्या काव्यनिर्मितीलाही विविध स्तरांवर गौरविण्यात आले असून, त्यांच्या साहित्यिक कार्याला व्यापक मान्यता मिळाली आहे.
साहित्याबरोबरच सामाजिक बांधिलकीची वाटचाल
साहित्य आणि पत्रकारितेबरोबरच डॉ. भोसले यांच्या सामाजिक कार्याचीही विशेष दखल घेतली जाते. ‘दारू सोडवा अभियान’ राबवून व्यसनमुक्तीचा संदेश देण्याचे काम ते करीत आहेत. तंबाखूजन्य पदार्थ आणि गुटख्याच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी तरुणांमध्ये जनजागृती करून त्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन ते करतात. विशेष गरजा असलेल्या मुलांच्या सेवेसाठीही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
साहित्य, भाषा, संशोधन, पत्रकारिता, सामाजिक प्रबोधन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या बहुआयामी योगदानाचा विचार करून ‘मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर इन मराठी’ (D.Litt.) हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
वाईकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव
डॉ. जनार्दन भोसले यांना मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय सन्मानाबद्दल साहित्यिक डॉ. पंडितराव टापरे, कवी फ. शहाजिंदे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, रिझर्व्ह बँकेचे संचालक आशुतोष रारावीकर, सीआयडी अधिकारी संतोष देसाई, डॉ. अरविंद भोरे, डॉ. सचिन वानखेडे, डॉ. संदीप जाधव यांच्यासह वाई तालुका पत्रकार संघातील पत्रकार, बावधन ग्रामस्थ, मित्रपरिवार, वाचक, साहित्यिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी डॉ. भोसले यांचे अभिनंदन केले.
मराठी भाषा, साहित्य आणि सामाजिक बांधिलकीची पताका आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणाऱ्या डॉ. जनार्दन भोसले यांच्या कार्याला मिळालेला हा सन्मान त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाचा गौरव तर आहेच; पण त्याचबरोबर मराठी साहित्यविश्वासाठीही अभिमानाचा क्षण असल्याची भावना साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.





















