शेकडो कुटुंबांना रोजगाराचा आधार देणाऱ्या मारुती भोसले यांचा सन्मान
अण्णाभाऊ साठे कामगार सेवा भूषण पुरस्कार जाहीर
वाई : प्रतिनिधी
बावधन गावाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभला आहे. आपल्या कर्तृत्वाने समाजात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव होत असला, तरी प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून समाजासाठी कार्य करणाऱ्या कर्तबगार व्यक्तींच्या कार्याची दखल घेण्याचे काम प्रतिकूल प्रतिष्ठान, वाई यांच्याकडून सातत्याने केले जाते. याच उपक्रमांतर्गत कामगार, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार, गरीब व गरजू तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देणारे बावधनचे सुपुत्र मारुती गणपत भोसले यांना ‘अण्णाभाऊ साठे कामगार सेवा भूषण पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
बावधन येथील जुन्या काळातील प्रगतिशील शेतकरी बयाजी बाबाजी भोसले यांच्या कुटुंबात मारुती भोसले यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गणपतराव भोसले हे माथाडी कामगार होते. चुलते माधव बापू बयाजी भोसले यांनी प्रगतिशील शेतकरी तसेच बावधन गावचे माजी सरपंच म्हणून उल्लेखनीय कार्य केले. चुलत बंधू मदन आप्पा भोसले यांनी बावधनचे आदर्श सरपंच, वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच विद्यमान खरेदी-विक्री संघाचे चेअरमन म्हणून सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेली आहे.
मारुती भोसले यांच्या सामाजिक व व्यावसायिक वाटचालीत त्यांचे थोरले बंधू वसंतराव भोसले, चुलत बंधू डॉ. अरविंद भोसले व राजेंद्र शिवाजीराव भोसले यांचे सहकार्य व प्रेरणा लाभली. पत्नी विद्या भोसले यांनीही त्यांच्या कार्याला मोलाची साथ दिली. त्यांच्या कन्या कीर्ती या बेंगळुरू येथील मर्सिडीज कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. अश्विनी या वाई औद्योगिक वसाहतीत उच्च पदावर कार्यरत असून धाकटी कन्या पूजा पवार या गृहिणी म्हणून संसाराची जबाबदारी सांभाळत आहेत.
मारुती भोसले यांनी मुंबई येथील श्री मराठा कापड बाजार कामगार मंडळ, माथाडी मुंबई येथे संचालक म्हणून काम केले. तसेच कापड बाजार सेवा सोसायटीच्या संचालकपदाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पार पाडली. या काळात मिळालेला कामगार चळवळीचा अनुभव त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी उपयुक्त ठरला.
बावधन येथे परतल्यानंतर त्यांनी वाई औद्योगिक वसाहतीतील विविध नामांकित कंपन्यांमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. सध्या अथर्व फाउंडेशनसारख्या नामांकित कंपनीची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहे. त्यांच्या माध्यमातून जवळपास २५० कामगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला असून, त्यांच्या कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्याला मोठा हातभार लागला आहे.
केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता बेरोजगारांच्या हाताला काम आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्याचे कार्य मारुती भोसले यांनी केले आहे. शेकडो कामगारांचे संसार उभे करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत प्रतिकूल प्रतिष्ठान, वाई यांच्या वतीने त्यांना ‘अण्णाभाऊ साठे कामगार सेवा भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रसिद्धीपासून दूर राहून कामगारांच्या जीवनात रोजगाराच्या माध्यमातून आशेचा किरण निर्माण करणाऱ्या मारुती भोसले यांच्या कार्याचा हा सन्मान म्हणजे कष्टकरी आणि कामगार वर्गाच्या योगदानाचाही गौरव असल्याचे प्रतिकूल प्रतिष्ठानने म्हटले आहे.





















