गुणवंत कामगार राजेंद्र कांबळे यांना ‘वंदे मातरम् सन्मान पुरस्कार’
सातारा l प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिन, ऑगस्ट क्रांती गौरव दिन आणि मैत्री दिनाचे औचित्य साधून आरे कॉलनी, गोरेगाव, मुंबई येथे आयोजित विशेष कार्यक्रमात भांडुप येथील गुणवंत कामगार व समाजसेवक राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना ‘वंदे मातरम् सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
मैत्री संस्था, युवा सामाजिक प्रतिष्ठान आणि धडक कामगार युनियन महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात कांबळे यांना शाल, पुष्पगुच्छ, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी दिलीप सेन, प्रसिद्ध अभिनेत्री पियू चव्हाण, कामगार नेते अभिजीत राणे, फिल्म सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विलास खानोलकर, संभाजी जाधवराव, राजमाता मासाहेब जिजाऊ यांचे चौदावे वंशज, अनघा राणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मैत्री संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुरज भोईर यांनी राजेंद्र कांबळे यांच्या सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, सहकार व आरोग्य क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला. विविध क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असलेले कांबळे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.
कांबळे यांच्या कार्याची यापूर्वीही महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाने दखल घेतली आहे. गेल्या वर्षी त्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राज्यपाल, राज्यमंत्री, कामगार मंत्री तसेच कामगार आयुक्त यांच्या हस्तेही त्यांचा गौरव झाला आहे. आजवर त्यांना शंभरहून अधिक पुरस्कार मिळाले असून, त्यांच्या कार्याची दखल घेत ‘वंदे मातरम् सन्मान पुरस्कारासाठी’ त्यांची निवड करण्यात आली.
दरम्यान, मैत्री संस्था व युवा सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सुरज भोईर यांचा वाढदिवसही यावेळी उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास अॅड. नेहा दुबे, मोहन जाधव, डॉ. प्रभाकर कांबळे, पत्रकार व गुणवंत कामगार अॅड. सोपान बुडबाजकर, साहित्यिक डॉ. मंगला परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा मांढरे यांनी केले, तर मान्यवरांचे स्वागत सुवर्ण बामणे यांनी केले. शेवटी ‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.
राजेंद्र कांबळे यांच्या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





















