Sat, Sep 5, 2026
पोलीस डायरी

अभिनेत्रीवरील अत्याचारप्रकरणी दिग्दर्शक शकील नुरानी साताऱ्यात ताब्यात

अभिनेत्रीवरील अत्याचारप्रकरणी दिग्दर्शक शकील नुरानी साताऱ्यात ताब्यात
Ashok Ithape
  • PublishedAugust 11, 2026

रेंगडीतील फार्महाऊसमध्ये लपून बसला होता; मेढा पोलिसांची कारवाई, मुंबई पोलिसांच्या स्वाधीन

सातारा | प्रतिनिधी

अभिनेत्रीवरील अत्याचार व लैंगिक छळाच्या गंभीर आरोपांप्रकरणी मुंबई पोलिसांना हवा असलेला चित्रपट दिग्दर्शक व निर्माता शकील नुरानी याला मेढा पोलिसांनी जावळी तालुक्यातील रेंगडी येथून ताब्यात घेतले. मुंबईत गुन्हा दाखल झाल्यानंतर नुरानी हा रेंगडी येथील फार्महाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मेढा पोलिसांशी संपर्क साधला.

मुंबईतील मालवणी पोलिस ठाण्यात नुरानी याच्याविरोधात ३३ वर्षीय अभिनेत्रीने अत्याचार व लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. आगामी चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने नुरानी याने अभिनेत्रीला घरी बोलावून घेतल्याचा आरोप आहे. तसेच तिला नशेचे पदार्थ देणे आणि चित्रिकरणाच्या माध्यमातून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मालवणी पोलिस नुरानीचा शोध घेत होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर तो सातारा जिल्ह्यातील रेंगडी येथे असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली.

यानंतर मेढा पोलिसांनी कारवाई करत रेंगडी येथील त्याच्या शेतघरावर छापा टाकला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी धीरजकुमार बेचके आणि शिवाजी डफळे यांनी ही कारवाई केली. यावेळी नुरानी याला ताब्यात घेण्यात आले.

नुरानीला ताब्यात घेतल्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक मेढा पोलिस ठाण्यात दाखल झाले. मेढा पोलिसांनी नुरानीला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले असून, त्याच्यावर मुंबईतच पुढील अटकेची व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

या प्रकरणामुळे चित्रपटसृष्टीसह सातारा जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!