पुणे – बंगळूर महामार्गावर शिरवळजवळ भीषण अपघात
भरधाव मोटार डिव्हायडरला धडकून विरुद्ध मार्गिकेत; ट्रकला धडकली मावळ – तळेगावातील चार तरुणांचा जागीच मृत्यू; दोघे गंभीर जखमी
वाई : प्रतिनिधी
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. भरधाव मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी एमएच १४ एलजे ३०३३ क्रमांकाची मोटार शिरवळ परिसरात आली असता चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. अनियंत्रित झालेली मोटार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला जोरदार धडकली. त्यानंतर मोटार पलटी होऊन विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत जाऊन समोरून येणाऱ्या केए २७ सी ५८७८ क्रमांकाच्या ट्रकवर आदळली.
धडक इतकी भीषण होती की मोटारीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात मावळ व कामशेत परिसरातील वेदांत अर्जुन वारिंगे, सोनलिंग धीरेंद्र ठाकूर, आदित्य बाळासाहेब गरुड आणि तळेगाव दाभाडे येथील निखिल बाळू राऊत या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर दीक्षित दयानंद पुजारी आणि मयूर हनुमंत शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच सारोळा महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आली आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थांनीही घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
या भीषण अपघातामुळे मावळ, कामशेत आणि तळेगाव दाभाडे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताच्या कारणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.





















