‘वो आ रहा है…!’ ‘इंद्रजाल’मधून साताऱ्याचा योगेश पवार (दांगट) मोठ्या पडद्यावर!
![]()
सामान्य घरातून बॉलिवूडपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास – सचिन ननावरे, वाई
“अभिनेता फक्त अभिनय करत नाही; तो प्रत्येक भावना जगत असतो. इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवताना स्वतःच्या वेदना पडद्यामागे ठेवत असतो.” या वाक्याचा प्रत्यय येतो तो सातारा जिल्ह्यातील गुणी कलाकार योगेश पवार (दांगट) यांचा प्रवास पाहताना.
चमकदार चित्रपटसृष्टीकडे अनेकजण केवळ ग्लॅमरच्या नजरेतून पाहतात. मात्र या झगमगाटामागे असंख्य संघर्ष, नकार, अपमान, अश्रू आणि अथक मेहनत दडलेली असते. त्या संघर्षावर मात करत सामान्य कुटुंबातील एक मराठी तरुण आता मोठ्या पडद्यावर दमदार झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे.
लहानपणापासूनच योगेशच्या मनात कलेचे वेड होते. अभिनय, लेखन, गायन, दिग्दर्शन, वादन अशा विविध कलांमध्ये त्याला रस होता. मात्र सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने आधी शिक्षण आणि नंतर करिअर करावे, अशी प्रत्येक वडिलांची अपेक्षा असते. योगेशचे वडीलही त्याला वारंवार समजावत होते. पण त्याच्या मनात कलाकार होण्याचे स्वप्न खोलवर रुजले होते.
महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्याने युट्युबवरील मराठी मालिका, अल्बम गीते, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वतःचे लेखन अशा अनेक माध्यमांतून सातत्याने काम सुरू ठेवले. या कामातून पैसा फारसा मिळत नव्हता; मात्र अनुभव आणि आत्मविश्वास नक्कीच मिळत होता. अखेर मुलाची जिद्द पाहून वडिलांनीही त्याला त्याच्या मार्गाने जाण्याची मोकळीक दिली.
योगेशने एम.ए. (हिंदी विशेष) पर्यंत शिक्षण पूर्ण केले. हिंदी विषय निवडण्यामागे एकच ध्यास होता—एक दिवस हिंदी चित्रपटसृष्टीत प्रमुख भूमिकेत झळकायचे. पण नियतीने मोठा आघात केला. शिक्षण सुरू असतानाच वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या दुःखातून स्वतःला सावरत त्याने पुन्हा नव्याने संघर्ष सुरू केला.
भूमिका मिळावी म्हणून अनेक दिग्दर्शक, निर्माते यांची दारे झिजवली. नकार पचवले. प्रसंगी इतर कामे करून स्वतःचा उदरनिर्वाह केला. तरीही त्याने कलेची साथ सोडली नाही. अभिनयाबरोबरच कथा लेखन, इंस्टाग्रामवरील मालिकांचे निर्मितीकार्य, लघुपट, सांस्कृतिक उपक्रम अशा विविध माध्यमांतून तो सातत्याने स्वतःला घडवत राहिला.
याच सातत्याचे फळ त्याला मिळाले. महाराष्ट्र राज्य पुरस्कारप्राप्त ‘बंदुक्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक नामदेव मुरकुटे यांनी योगेशमधील कलाकार ओळखला. त्यांनी केवळ मार्गदर्शनच केले नाही, तर त्याला आयुष्य बदलणारी मोठी संधीही दिली.
२४ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘इंद्रजाल’ या चित्रपटात योगेश पवार (दांगट) ‘भुरा’ या आदिवासी सरदाराची अत्यंत महत्त्वाची आणि आव्हानात्मक भूमिका साकारत आहे. नवखा कलाकार असूनही त्याने या भूमिकेत उल्लेखनीय आत्मविश्वास आणि प्रभावी अभिनय केला असल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत सुरू आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या टायटल साँगचे गीतलेखन करण्याची संधीही योगेशला मिळाली आहे. त्यामुळे अभिनेता आणि गीतकार अशा दुहेरी भूमिकेत तो प्रेक्षकांसमोर येत आहे.
आपल्या यशाविषयी बोलताना योगेश भावूक होतो. “आज हे यश पाहायला बापू असायला हवे होते. माझ्या प्रत्येक यशाचे श्रेय मी त्यांनाच अर्पण करतो,” असे तो कृतज्ञतेने सांगतो. त्याचबरोबर नामदेव मुरकुटे, विक्रमसेन चव्हाण, अरुण कचरे (दादा), समाधान पाटील, कल्पेश जगताप आणि अजय निकम यांसारख्या मार्गदर्शकांनी वेळोवेळी दिलेल्या पाठबळाचाही तो आवर्जून उल्लेख करतो.
चित्रपटसृष्टीत ग्लॅमर जितके आहे, तितकाच संघर्षही आहे. अनेक गुणी कलाकार योग्य संधी किंवा योग्य मार्गदर्शकाच्या अभावामुळे पडद्यामागेच राहतात. हिऱ्याची पारख करणारा जोहरी मिळाला, तरच त्या हिऱ्याला खरे मूल्य प्राप्त होते. योगेश पवारच्या आयुष्यात हा जोहरी योग्य वेळी भेटला आणि त्याच्या प्रतिभेला योग्य दिशा मिळाली.
आज योगेशचे ‘इंद्रजाल’मधील पदार्पण ही केवळ एका कलाकाराची भूमिका नाही; तर सातारा जिल्ह्यातील असंख्य स्वप्नाळू तरुणांसाठी प्रेरणेचा किरण आहे. मेहनत, सातत्य आणि स्वतःवरील विश्वास असेल, तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो, याचे तो जिवंत उदाहरण आहे.
‘इंद्रजाल’ हा योगेशच्या कलाप्रवासाचा शेवट नाही, तर एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे. त्याने भविष्यात आणखी मोठी भरारी घ्यावी, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवावा आणि सातारा जिल्ह्याचे नाव देशभर उज्ज्वल करावे, हीच अपेक्षा.
‘इंद्रजाल’ चित्रपटाची,त्यातील ‘भुरा’ ची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे.त्यातील एक डायलॉग सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे…’वो आ रहा है…!’ योगेशच्या बाबतीत पण हीच गोष्ट लागू होतेय…उंच भरारी घेण्यासाठी ‘वो आ रहा है…!





















