Tue, Jul 21, 2026
स्थानिक बातम्या

खावली शाळेतील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; प्रभारी मुख्याध्यापक धर्मेंद्र दीक्षित निलंबित

खावली शाळेतील मारहाण प्रकरणात मोठी कारवाई; प्रभारी मुख्याध्यापक धर्मेंद्र दीक्षित निलंबित
Ashok Ithape
  • PublishedJuly 18, 2026

शिक्षिका व विद्यार्थ्यांना मारहाण केल्याप्रकरणी सीईओ याशनी नागराजन यांचे आदेश; विभागीय चौकशी सुरू, वाई पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल

सातारा, दि. १७ : वाई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खावली येथे शिक्षिका आणि विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या गंभीर प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीची कारवाई करत प्रभारी मुख्याध्यापक धर्मेंद्र विष्णू दीक्षित यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वाई यांनी सादर केलेल्या अहवालानुसार प्रभारी मुख्याध्यापक धर्मेंद्र दीक्षित यांनी शिक्षण सेविका उज्वला गोपाळ जाधव तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी १६ जुलै २०२६ रोजी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम, १९६४ अंतर्गत धर्मेंद्र दीक्षित यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय कराड येथे निश्चित करण्यात आले असून, त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.

दरम्यान, त्यांच्या ताब्यातील सर्व प्रशासकीय जबाबदाऱ्या इतर अधिकाऱ्याकडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणात धर्मेंद्र दीक्षित यांच्याविरोधात विभागीय खातेनिहाय चौकशी सुरू करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, पुढील चौकशीनंतर आवश्यक ती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!