दिवंगत पत्रकार कै. नितीन साळुंखे यांच्या कन्येच्या शिक्षणासाठी ऋषिकेश ढाणे यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात
नागठाणे, प्रतिनिधी : नागठाणे विभाग पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार कै. नितीन साळुंखे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा आधारवड हरपल्यानंतर त्यांच्या कन्या कु. सानिका साळुंखे हिच्या उच्च शिक्षणास आर्थिक अडचणी निर्माण होऊ नयेत, या सामाजिक जाणिवेतून नागठाणे विभाग पत्रकार संघाच्या वतीने मदतीचा पुढाकार घेण्यात आला आहे.
यासाठी पुढाकार घेऊन मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता घाडगे यांनी पाडळी येथील प्रगतशील शेतकरी व दानशूर व्यक्तिमत्त्व ऋषिकेश ढाणे यांच्याशी संपर्क साधून कै. नितीन साळुंखे यांच्या कुटुंबाची परिस्थिती व सानिकाच्या शिक्षणाची माहिती दिली. समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या ढाणे यांनी कोणतीही विलंब न करता मदतीसाठी तात्काळ होकार देत कु. सानिका साळुंखे हिच्या पुढील शिक्षणासाठी धनादेशाच्या स्वरूपात आर्थिक मदत प्रदान केली.
नागठाणे विभाग पत्रकार संघाशी अनेक वर्षांपासून ऋणानुबंध जपणारे ऋषिकेश ढाणे हे पत्रकार संघाच्या विविध सामाजिक उपक्रमांना सातत्याने सहकार्य करत आले आहेत. पत्रकार समाजासाठी अहोरात्र कार्य करत असताना त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे ही समाजाची नैतिक जबाबदारी असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी ही मदत दिली.
यावेळी नागठाणे विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पंचपोर, उपाध्यक्ष विजय घोरपडे, विजय अलाटे, विकास जाधव, प्रताप भोसले,दत्ता घाडगे, किरण पवार, संदीप जाधव आणि शरद पवार हे पत्रकार बांधव उपस्थित होते. उपस्थितांनी ऋषिकेश ढाणे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत अशा मदतीमुळे गरजू कुटुंबाला मोठा आधार मिळत असल्याची भावना व्यक्त केली.
कु.सानिकाच्या शिक्षणासाठी मदतीचे आवाहन
सानिकाच्या शिक्षणासाठी समाजाने पुढे यावे कै. नितीन साळुंखे यांच्या कन्या कु. सानिका साळुंखे ही सध्या कोल्हापूर जिल्ह्यातीलतळसावडे येथे डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलातउच्च शिक्षण घेत आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या शिक्षणाचा खर्च पेलणे कुटुंबासाठी आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, विविध संस्था आणि हितचिंतकांनी पुढाकार घेऊन सानिकाच्या शिक्षणासाठी शक्य ती आर्थिक मदत करावी, असे आवाहन नागठाणे विभाग पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वतःचे दुःख बाजूला ठेवत पत्रकार कुटुंबासाठी मदतीचा हात
अवघ्या एक महिन्यापूर्वी ऋषिकेश ढाणे यांच्या मातोश्रींचे दुर्दैवी अपघाती निधन झाले. स्वतःच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्यांनी आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या संवेदनशील, माणुसकी जपणाऱ्या आणि समाजाभिमुख कृतीबद्दल परिसरातून त्यांचे विशेष कौतुक होत असून, समाजासमोर त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.





















