जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंत कामगारांना ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पदाचे नियुक्तीपत्र वितरण
सातारा : राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे कार्याचे कौतुक, सात गुणवंत कामगारांवर महत्त्वाची जबाबदारी
भुईंज | प्रतिनिधी : महेंद्रआबा जाधव : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून शासन निर्णय २०२५ मधील तरतुदींनुसार सातारा जिल्ह्यातील पात्र गुणवंत कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी (SEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते तसेच सातारा तहसीलदार वैभव पिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त अधिकाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्र, ओळखपत्र आणि अधिकृत शिक्क्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या कार्याचे कौतुक करत, “असोसिएशनचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी समाजाभिमुख दृष्टीकोन ठेवून राष्ट्रीय हित जपणारे कार्य करावे,” असे आवाहन केले.
राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन घाडगे आणि विभागीय सदस्य शंकरराव मांढरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण लेखी पाठपुराव्यामुळे ही नियुक्ती प्रक्रिया यशस्वी झाली. या अंतर्गत संजय गिरी, चंद्रकांत लोहार, प्रजय राऊत, संजय पवार, विठ्ठल तांबे, महेंद्र धनवे आणि आनंदा पाटील यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव यांच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील व तहसीलदार वैभव पिलारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर नवनियुक्त अधिकारी तसेच ज्येष्ठ गुणवंत कामगार दिलीपराव चरेगावकर आणि गोपाळराव खजुरे यांचाही गौरव करण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक दिलीपराव चरेगावकर यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी चरेगावकर यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांना त्यांच्या पदाच्या जबाबदाऱ्या, अधिकार आणि कार्यपद्धतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या सोहळ्यास महसूल सहाय्यक नितीन मतकर आणि दीपक गुरव यांच्यासह राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सातारा जिल्ह्यातील गुणवंत कामगार प्रतिष्ठानचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चहापानानंतर दिमाखदार वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. नवनियुक्त सर्व विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





















