राज्यस्तरीय विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी हणमंत ढवळे यांची निवड
![]()
सातारा जिल्ह्यातील एकमेव मानकरी; महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर
सातारा, दि. १७ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार २०२४ साठी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातून गरवारे टेक्नीकल फायबर्स, वाई येथील कर्मचारी श्री. हणमंत सिताराम ढवळे यांची प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत कामगार कल्याण निधी भरणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांच्या साहित्य, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून १६ जून रोजी सन २०२४ साठीची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. राज्यभरातून एकूण ५१ गुणवंत कामगारांची निवड करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील एकमेव प्रतिनिधी म्हणून श्री. हणमंत ढवळे यांना हा मान मिळाला आहे.
या पुरस्कारामध्ये २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. श्री. ढवळे यांच्या निवडीमुळे गरवारे टेक्नीकल फायबर्स तसेच सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





















