वाई-खंडाळ्यातील सिंचन प्रकल्पांना गती; प्रलंबित उपसा योजनांची कामे लवकर पूर्ण होणार : राधाकृष्ण विखे पाटील
![]()
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वपूर्ण बैठक; कवठे, केंजळसह खंडाळा तालुक्यातील सिंचन प्रश्नांवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा
वाई, प्रतिनिधी : वाई विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रलंबित उपसा सिंचन योजनांची कामे गतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत वाई विधानसभा मतदारसंघातील सिंचनाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीला जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व सचिव उपस्थित होते.
बैठकीत कवठे व केंजळ उपसा सिंचन योजनांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत आढावा घेण्यात आला. तसेच खंडाळा तालुक्यातील गावडेवाडी, शेखमीरवाडी आणि वाघोशी येथील उपसा सिंचन योजनांमधील अडचणी दूर करून ती कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने चर्चा झाली.
याशिवाय धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्याच्या लाभापासून वंचित राहिलेल्या खंडाळा तालुक्यातील १४ गावांना सिंचनाचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक नियोजन आणि पुढील कार्यवाहीची रणनीती बैठकीत ठरवण्यात आली.
यावेळी सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. वाई विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी प्रलंबित सिंचन प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
फोटो ओळ : मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात वाई विधानसभा मतदारसंघातील सिंचनाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





















