Wed, Jun 17, 2026
सातारा जिल्हा

महाबळेश्वर, खंडाळा व वाई आगाराला ‘राजमाता जिजाऊ’च्या ३० नव्या स्मार्ट बसेस

महाबळेश्वर, खंडाळा व वाई आगाराला ‘राजमाता जिजाऊ’च्या ३० नव्या स्मार्ट बसेस
Ashok Ithape
  • PublishedJune 16, 2026

प्रत्येकी १० बसेसचा ताफा दाखल; अत्याधुनिक सुविधांमुळे ग्रामीण प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित व आरामदायी

सातारा प्रतिनिधी : वैभवशाली महाराष्ट्राच्या इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने नव्या अत्याधुनिक बसेस दाखल झाल्या आहेत. सातारा विभागाला मिळालेल्या ३० नव्या बसेसपैकी महाबळेश्वर, खंडाळा आणि वाई आगाराला प्रत्येकी १० बसेस देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्मार्ट आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या सन्मानार्थ या नव्या बससेवेला ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जिजाऊंच्या मातृशक्तीचा गौरव या नावातून अधोरेखित करण्यात आला आहे.

या भागाचे लोकप्रतिनिधी तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे वाई, खंडाळा व महाबळेश्वर आगाराला या नव्या बसेस उपलब्ध झाल्या आहेत.

‘राजमाता जिजाऊ’ बसेसची ठळक वैशिष्ट्ये

  • ३ × २ आसन रचना व एकूण ५६ आसन क्षमता
  • जुन्या बसेसपेक्षा १६ आसने अधिक
  • ४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सुरक्षा व्यवस्था
  • जीपीएस प्रणाली व पॅनिक बटन सुविधा
  • पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम व इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक
  • प्रत्येक आसनाजवळ मोबाईल चार्जिंग पॉइंट
  • एअर सस्पेन्शनमुळे अधिक आरामदायी प्रवास
  • बीएस-६ शक्तिशाली इंजिन व ट्युबलेस टायरमुळे सुरक्षितता

यापूर्वीही एसटी महामंडळाने ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘यशवंती’ आणि ‘हिरकणी’ अशा ऐतिहासिक नावांच्या बससेवा सुरू करून प्रवाशांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. सातारा विभागाने महामंडळाकडे सुमारे १०० नव्या बसेसची मागणी केली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३० ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल झाल्याची माहिती विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!