भुईंजमध्ये प्लास्टिक हटाव मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामस्थांनी केला प्लास्टिक निर्मूलनाचा निर्धार
![]()
सुमारे दोन ट्रॉली प्लास्टिक संकलन; स्वच्छ व प्लास्टिकमुक्त गावासाठी सर्व घटकांचा सामूहिक सहभाग
भुईंज : भुईंज गाव व परिसर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्लास्टिक हटाव जनजागृती व संकलन मोहिमेला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत सुमारे दोन ट्रॉली प्लास्टिक कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
या मोहिमेत भुईंज ग्रामपंचायतीचे सरपंच विजय वेळे, उपसरपंच शुभम पवार, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शेळके, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, आशा सेविका, सामाजिक कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, सेवाभावी संस्था तसेच निरंकारी मंडळाच्या सदस्यांनी सामुदायिक सहभाग नोंदवत ही मोहीम यशस्वी केली.
भुईंज बसस्थानक परिसरातील उड्डाणपुलापासून ते कृष्णा नदीच्या काठापर्यंत स्वच्छता व प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली. यावेळी संकलित प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन करण्यात आले.
ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शेळके यांनी उपस्थितांना प्लास्टिकमुक्त गावाची शपथ दिली. कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य अमित लोखंडे यांनी मानले.





















