डॉ.शेखर कांबळे यांना आरोग्य उत्कर्ष पुरस्कार प्रदान
वाई, दि. 24 – वाईतील माधवबाग क्लिनिकचे संचालक वैद्यक व्यावसायिक व वाई अर्बन बँकेचे उपाध्यक्ष डॉ. शेखर बाळकृष्ण कांबळे यांना यावर्षीचा राज्यस्तरीय आरोग्य उत्कर्ष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
वाईतील कन्या शाळा सत्यवती जोशी सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात उद्योग उत्कर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री अभिषेक घागरे, ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. प्रभाकर जोशी यांच्या हस्ते सन्मानपत्र, श्रीफळ व शाल देऊन डॉ. कांबळे यांचा नुकताच गौरव करण्यात आला. याप्रसंगी सीए. गाडगीळ, कृषी अधिकारी काळे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. मनिषा घैसास, तृप्ती पंडित, शाम चावलानी, प्रा. वैराट व मान्यवर उपस्थित होते.
डॉ. शेखर कांबळे यांनी वाईच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. माधवबाग क्लिनिकच्या माध्यमातून त्यांनी वाई परिसरातील रुग्णांना नवसंजीवनी देण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यासोबतच त्यांच्या पत्नी डॉ. तरल कांबळे यादेखील वैदिक व्यावसायिक असल्याने त्याही डॉ. कांबळे यांच्या व्यवसायात हातभार लावतात.
वैद्यकीय व्यवसाय बरोबरच डॉ. शेखर कांबळे यांनी सामाजिक क्षेत्रातही आपले योगदान दिले आहे. वैद्यक व्यावसायिकांची नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) संघटनेचे ते वाई तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. या संघटनेच्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसाय बरोबरच सामाजिक उपक्रम राबवून समाजाचा तळागाळातील जनतेच्या भल्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. मोफत आरोग्य तपासणी शिबिरे राबवली जातात. गरजूंना मोफत औषध पुरवठा केला जातो. आपत्ती काळात मोफत वैद्यकीय सुविधा पुरवली जाते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी आवश्यक तेथे वैद्यकीय व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते.
विविध सामाजिक कामे करीत असताना डॉ. शेखर कांबळे हे वाईतील आर्थिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या दि वाई अर्बन को. ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून गेली तेरा वर्षे काम पाहत आहेत. बँकेचे उपाध्यक्ष म्हणून गेले तीन वर्षे ते कार्यरत आहेत. बँकेच्या माध्यमातून या परिसरातील व्यापारी, उद्योजक, वैद्यक व्यावसायिक, नोकरदार यांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम त्यांनी सुरू ठेवले आहे. विविध सामाजिक कामांमध्ये बँक नेहमीच आघाडीवर राहून काम करते. त्याच बँकेचे उपाध्यक्ष म्हणून डॉ. शेखर कांबळे हे देखील अर्थकारणात चांगली कामगिरी बजावत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून त्यांना राज्यस्तरीय आदर्श आरोग्य उत्कर्ष पुरस्कार नुकताच वाई येथे प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष अनिल देव, सर्व संचालक, निमा असोसिएशनचे सर्व सदस्य व वाईतील मान्यवरांनी डॉक्टर कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.
फोटो ओळी – डॉ. शेखर कांबळे यांचा गौरव करताना श्री. प्रभाकर जोशी





















