Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

शिक्षण

जावलीत शैक्षणिक क्रांतीला नवी दिशा

जावलीत शैक्षणिक क्रांतीला नवी दिशा
Ashok Ithape
  • PublishedMay 10, 2026

UPSC-MPSC मार्गदर्शनासाठी पुढाकार; गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार नवे व्यासपीठ

प्रतिनिधी | जावली : श्रीमान्य आर. के. धनावडे साहेब यांच्या पुढाकारातून जावली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात “शिक्षणाचं माहेरघर” म्हणून ओळख निर्माण केलेल्या जावली तालुक्यात आता UPSC आणि MPSC परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन, मोटिवेशनल लेक्चर्स आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

डोंगराळ भौगोलिक परिस्थिती आणि शेतीसाठी मर्यादित साधनसंपत्ती असूनही जावली तालुक्यातील अनेक कुटुंबांनी शिक्षणालाच प्रगतीचा मुख्य मार्ग मानला. त्यातूनच सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला “जावली पॅटर्न” उदयास आला. आज तालुक्यातील अनेक विद्यार्थी UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली ही शैक्षणिक क्रांती संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

विशेष म्हणजे, जावली तालुक्यातून UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी होणारे पहिले अधिकारी म्हणून श्री ओमकार पवार सर यांनी जावली तालुक्याचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा निर्माण झाली असून स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांच्या प्रेरणेतून आणि राज्यातील वरिष्ठ राजपत्रित अधिकारी तसेच मंत्रालयीन अनुभवाच्या बळावर विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, अधिकाधिक क्लास वन व क्लास टू अधिकारी घडावेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

येत्या काळात जावली तालुक्यात विविध मोटिवेशनल लेक्चर्स, हायस्कूल स्तरावरील करिअर मार्गदर्शन, नवीन उद्योजक घडविण्यासाठी मार्गदर्शन, विविध क्षेत्रांतील नोकरी संधींबाबत माहिती तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी तालुक्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी व क्लास वन अधिकारी देखील सहकार्य करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जावलीच्या विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे हे कार्य काळाची गरज असून श्रीमान्य आर. के. धनावडे साहेब यांनी असेच प्रेरणादायी कार्य पुढेही सुरू ठेवावे, अशा भावना जावली युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रसिद्ध समाजसेवक तथा उद्योजक डॉ. विजय दिघे आणि जावलीकरांकडून व्यक्त होत आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!