Sat, May 30, 2026
Close

Recent Posts

साहित्य

आहार हेच औषध : जीवनशैलीत बदल केल्यास अनेक आजारांवर नियंत्रण शक्य ; डॉ. वनिता अशोक

आहार हेच औषध : जीवनशैलीत बदल केल्यास अनेक आजारांवर नियंत्रण शक्य ; डॉ. वनिता अशोक
Ashok Ithape
  • PublishedMay 3, 2026

वाई, दि. २ मे : वाई वसंत व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात “आहार हेच औषध” या विषयावर डॉ. वनिता अशोक यांचे प्रभावी व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनघा दातार होत्या.

डॉ. वनिता अशोक यांनी आपल्या व्याख्यानात आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या आजारांचे मूळ कारण स्पष्ट करत आहार आणि दैनंदिन सवयींमध्ये बदल करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. अशोक म्हणाल्या, ” आपल्या दैनंदिन आयुष्यातील छोट्या-छोट्या सवयींचा आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो, मात्र आपण त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. उदाहरणार्थ, गर्भवती स्त्रीला बाळंतपणानंतर प्रथम चहा-बिस्किट देण्याची प्रथा किंवा पाहुण्यांना चहाने स्वागत करण्याची सवय ही आरोग्यदृष्ट्या योग्य नाही.

चहा हा केवळ पेय नसून तो मानसिक सवयीचा भाग बनला आहे. दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही, हीच एक मानसिकता झाली आहे. त्यात असलेली साखर आरोग्यासाठी घातक ठरते. याला पर्याय म्हणून लिंबूपाणी हा अधिक योग्य व किफायतशीर पर्याय आहे, विशेषतः वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर.
लोक साखर, भात, बटाटा टाळतात, पण गुळाचा चहा पिण्यास सुरुवात करतात. प्रत्यक्षात गूळ आणि साखर यांच्यात फारसा फरक नाही; दोन्हींचा शरीरावर परिणाम सारखाच होतो. त्यामुळे ‘गुळाचा चहा’ हा आरोग्यदायी पर्याय नाही.

आज प्रत्येक घरात मधुमेह, थायरॉईड किंवा पीसीओडीसारखे आजार आढळतात. हे सर्व आजार आपल्या जीवनशैलीशी निगडित आहेत आणि त्यावर उपायही जीवनशैलीत बदल केल्यानेच शक्य आहे. आहार आणि व्यायाम हेच या आजारांचे मूळ नियंत्रण आहे.
घरातील साध्या डाळ-खिचडीमध्ये सुमारे ३०० कॅलरीज असतात, तर बाहेरच्या त्याच पदार्थात बटर आणि इतर घटकांमुळे कॅलरीज दुप्पट होतात. त्यामुळे शक्यतो घरगुती अन्नालाच प्राधान्य द्यावे. स्विगी-झोमॅटो सारख्या अँप्सचा वापर कमी करणे आवश्यक आहे. आज २२-२३ वर्षांचे तरुणही प्रीडायबेटिक अवस्थेत आहेत. तणाव, झोपेचा अभाव आणि असंतुलित आहार यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे प्राणायाम, नियमित चालणे आणि योग्य दिनचर्या अत्यावश्यक आहे.

रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे आणि सकाळी उशिरा उठणे ही सवय आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. सर्वप्रथम मोबाईलपासून अंतर ठेवणे आवश्यक आहे. जेवणात चपाती किंवा भात कमी आणि भाजी, डाळ व सॅलड अधिक असावे. प्रमाण आणि वेळ या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जसे औषधे वेळेवर घेतो, तसेच आहारही वेळेवर घेतला पाहिजे.

जीवनशैलीत बदल करून आम्ही अनेक रुग्णांची साखरेची पातळी कमी केली आहे. काही प्रकरणांमध्ये इन्सुलिनची गरजही कमी झाली आहे.

आहारात ८० टक्के आणि व्यायामात २० टक्के लक्ष दिले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार आठवड्यात किमान १५० मिनिटे व्यायाम आवश्यक आहे. रोज किमान ६००० पावले चालणे ही चांगली सुरुवात ठरू शकते. प्रोसेस्ड फूड, त्चिप्स, पॅकेट फूड, पावडरयुक्त पदार्थ यांचा पूर्णतः त्याग करावा. चरबी आणि अति तेलकट पदार्थ हे अनेक आजारांचे मूळ कारण आहेत.
दूध आणि अंडी हे पूर्ण प्रथिनांचे स्रोत आहेत. बी१२ची कमतरता असल्यास प्राणिजन्य अन्न किंवा सप्लिमेंट्स घ्यावेत. भारतात ही कमतरता मोठ्या प्रमाणावर आढळते.

दररोज एक-दोन फळे खाणे योग्य आहे. पेरू हे सर्वात उत्तम फळ आहे कारण त्यात फायबर, प्रथिने आणि पोषणमूल्ये भरपूर आहेत. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. कोलेस्टेरॉल हे शरीरासाठी आवश्यक असते. मात्र अति तेलकट पदार्थ टाळणे गरजेचे आहे. लसूण हा कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारा घटक आहे.”

शेवटी त्यांनी ठामपणे सांगितले की, “जीवनशैलीमुळे निर्माण झालेले आजार जीवनशैलीत बदल केल्यानेच नियंत्रित होतात. औषधांचा उपयोग तात्पुरता असतो; दीर्घकालीन उपाय म्हणजे योग्य आहार आणि संतुलित जीवनशैली. मात्र गंभीर लक्षणे असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.”

प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनील शिंदे यांनी केले, तर सौ.सुलभा प्रभुणे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुहास देशपांडे यांनी केले. डॉ मनोहर दातार व डॉ लता पाटील हे या कार्यक्रमाचे प्रायोजक असल्याने त्यांचा डॉ वनिता यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या व्याख्यानातून उपस्थितांना आरोग्यदायी जीवनशैलीचा मूलभूत संदेश मिळाला.

फोटो ओळी – डॉ वनिता अशोक यांचा सत्कार करताना कार्याध्यक्षा सौ तनुजा इनामदार शेजारी सौ अनघा दातार

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!