किकलीतील वीरगळ साताऱ्यातील वीरांच्या परंपरेचा पुरावा ; डॉ चैतन्य साठे.
![]()
जावे राऊळासीवर वसंत व्याख्यानमालेचे दहावे पुष्प
वाई, ता. १०: किकलीत शंभराच्या आसपास असणारे वीरगळ साताऱ्याला असणाऱ्या सैनिकी व वीरतेच्या परंपरेचा पुरावा आहेत, असे सुप्रसिद्ध मंदिर स्थापत्यशास्त्र अभ्यासक आणि संशोधक डॉ चैतन्य साठे वाई वसंत व्याख्यानमालेच्या दहाव्या पुष्पात ‘जावे राऊळासी’ या विषयावर बोलताना म्हणाले. यावेळी टिळक स्मारक संस्थेचे संचालक श्री आदित्य चौंडे अध्यक्षस्थानी होते.
साठे म्हणाले, मंदिरात दर्शनाला जाऊन डोळे बंद करतात. भारतीय परंपरेत दर्शन म्हणजे तत्त्वज्ञान. मंदिरांची केवळ धार्मिक बाजू नाही तर आर्थिक, सामाजिक, व राजकीय बाजू देखील पहावी. ओडिसातील लिंगराज मंदिर गंगराजांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे ही धार्मिक बाजू. तर पुण्यातील जेजुरीचे मंदिर यात्रेसाठी प्रसिद्ध आहे हे सामाजिक एकत्रिकरण व सांस्कृतिक बाजू आहे. मदुराईच्या मीनाक्षी मंदिरात गेल्या आठशे वर्षांपासून आजपर्यंत बाजार भरतो, ही आर्थिक बाजू झाली. उदयगिरीतील मंदिरात पाचव्या शतकातील विक्रमादित्याने स्वतःचे वर्चस्व दाखवणारी शिल्पे कोरली ही राजकीय बाजू आहे.
नागपूरच्या रामटेक मधील नरसिंह मंदिर समुद्रगुप्ताच्या कन्येने तिचा पती रुद्रसेन यांच्या स्मरणार्थ बांधले, यावरून प्राचीन भारतात राण्यांच्या हाती सत्ता व पैसा असल्याचे समजते. चेनकेश्वर मंदिराच्या खिडकीवरील शिल्प राजा विष्णुवर्धन याच्या जैन धर्म ते वैष्णव पर्यंतचा प्रवास दर्शवते.
राजेंद्र चोल राजाने बांधलेल्या कर्नाटकच्या बृहदेश्वर मंदिरात मराठीतील सर्वात मोठा शिलालेख आहे. मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारण ३- ४ थ्या शतकात झाली. बौद्धस्थापत्य तत्पूर्वीपासून होते. मंदिर स्थापत्याच्या सुरुवातीस केवळ दगडांच्या शुष्क सांधी रचना असत. अशा छोट्या मंदिरांपासून अकराव्या शतकात खजुरावच्या प्रचंड मंदिरापर्यंत स्थापत्याचा विकास झाला.
नाशिकच्या गोंदवेश्वर मध्ये एक मुख्य देवतेचे मंदिर व इतर देवतांची बाजूला अशी पंचायतान पद्धत दिसते. नंतरच्या काळात मुघल वास्तुशैलीचा परिणामही मंदिरांवर दिसतो. रायगडावरील जगदीश्वराचे मंदिर याचे उदाहरण आहे. पेशव्यांच्या काळात मंदिरांच्या शिखरांना गोलाई आली ,मिनारही काही मंदिरांत दिसू लागले. मेनवलीचे नरसिंह मंदिर व पुण्याचे देवदेवेश्वर मंदिर या प्रकारचे आहे. यवतच्या भुलेश्वर मंदिरात रामजन्मवर्दीचे शिल्प आहे यात उंटांवर नगारे चितारले आहेत. रामायणात उंटांचा उल्लेख नाही यावरून तेव्हाची स्थानिक संस्कृती दिसते. काही मंदिरांवरती पंचतंत्रातल्या गोष्टी देखील कोरल्या आहेत. हम्पीच्या विजयविठ्ठल मंदिरात तत्कालीन भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे शिल्प आहे. ही मंदिरे इतिहासाशी अजून जवळीक करतात नव्या गोष्टींचा परिचय देतात आणि आपली संस्कृती साजरी करता येते.
साठे यांनी नागर, द्राविड, वेसर, कलिंग, मराठा, मिश्र अशा कित्येक मंदिर स्थापत्य प्रकारांची माहिती प्रेक्षकांना दिली. सौ सुधा जाधव यांनी परिचय केला,विश्वस्त सुनील शिंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर डॉ योगिता राजकर यांनी आभार मानले. कै जयश्री व डॉ वि ना गोखले स्मरणार्थ डॉ संजीव गोखले यांनी कार्यक्रमाचे प्रायोजन केले होते. वाईकरांनी व्याख्यानास उपस्थिती लावली.
मंदिराची अंगे
• दरवाजा: याच्या चौकटींवर द्वारपालांची शिल्पे असतात.
• रंगमंडप: येथे गायन ,वादन, नृत्य, नाट्य आदि कला देवतांसाठी प्रस्तुत करण्यात येतात.
• अंतराळ: रंग मंडप व गाभारा यांना जोडणारा अरुंद बोळ तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने अंतराळ स्थावर जगाकडून अध्यात्मिक जगाकडे नेतो.
• गर्भगृह: येथे देवतेच्या मूर्ती स्थापित असतात.
फोटो खालील ओळी – वक्ते डॉ चैतन्य साठे मार्गदर्शन करताना शेजारी आदित्य चौंडे.













