कुणबी प्रमाणपत्रासाठी अडचणी? सातारा जिल्हा प्रशासनाची विशेष हेल्पलाईन सुरू
![]()
मराठा-कुणबी प्रमाणपत्र, जात पडताळणी व नोंदी शोधण्यासाठी नागरिकांना मिळणार मार्गदर्शन; ०२१६२-२३२१७५ क्रमांकावर संपर्काचे आवाहन
सातारा, दि. ३ : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत गठीत मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशी तसेच नुकत्याच झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कुणबी जात प्रमाणपत्र मिळविताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार कुणबी प्रमाणपत्रांचे तातडीने वितरण व्हावे, यासाठी आवश्यक नोंदी शोधणे, जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्याबाबत मार्गदर्शन करणे तसेच मराठा-कुणबी प्रमाणपत्रासंदर्भातील विविध शंका व अडचणींचे निराकरण करण्यासाठी सातारा जिल्ह्यासाठी ०२१६२-२३२१७५ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
या हेल्पलाईनद्वारे नागरिकांना आवश्यक माहिती, मार्गदर्शन व प्रशासकीय प्रक्रियेबाबत सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





















