Wed, Jun 3, 2026
Media महाराष्ट्र

संकल्प न्यूजचे संपादक अशोक इथापे यांना महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती; विश्वासार्ह पत्रकारितेची शासनाकडून दखल

संकल्प न्यूजचे संपादक अशोक इथापे यांना महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती; विश्वासार्ह पत्रकारितेची शासनाकडून दखल
Ashok Ithape
  • PublishedJune 3, 2026
  • अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे व पत्रकार जीवनधर चव्हाण यांच्या हस्ते अधिस्वीकृती कार्ड प्रदान.

वाई, प्रतिनिधी : येथील ‘संकल्प न्यूज’ साप्ताहिकाचे मालक-संपादक तसेच संकल्प न्यूज पोर्टल आणि संकल्प मध्यम समूहाचे प्रमुख अशोक इथापे यांना (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय) महाराष्ट्र शासनाकडून पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत (Accreditation) अधिस्वीकृती प्रदान करण्यात आली आहे.

पुणे विभाग पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सातारा जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हरीश पाटणे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे आणि दैनिक पुढारीचे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण यांच्या हस्ते अशोक इथापे यांना अधिस्वीकृती कार्ड प्रदान करण्यात आले.

अशोक इथापे हे गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी ‘संकल्प न्यूज’ साप्ताहिकाच्या माध्यमातून विविधता, वाचनीयता आणि विश्वासार्हता या त्रिसूत्रीवर आधारित पत्रकारिता जोपासली आहे. महिला, तरुणाई, विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांसाठी उपयुक्त सदरे व विश्वासार्ह आणि सकारात्मक बातम्या प्रसिद्ध करण्यामध्ये त्यांचा विशेष सहभाग राहिला आहे.

आधुनिक पत्रकारितेच्या प्रवाहाशी सुसंगत राहून त्यांनी संकल्प न्यूज पोर्टल व संकल्प न्यूज मराठी युट्यूब चॅनलची स्थापना केली. डिजिटल माध्यमांद्वारे जिल्ह्यातील पत्रकारितेत स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे.

पत्रकारितेबरोबरच ज्ञानसंकल्प अबॅकस अँड ब्रेन डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर, Dmit करिअर कौन्सिलिंग सेंटर तसेच संकल्प संगीत साधना केंद्राच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व कला क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. विविध सण, उत्सव, यात्रा-जत्रा, पर्यावरण, ग्राम विकास, शिक्षण, करिअर आणि सामाजिक विषयांवरील माहितीपट आणि विशेषांक प्रकाशित करण्यामध्येही त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते समाजकार्यातही सक्रिय आहेत.

पद्मश्री. शाहीर साबळे यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त त्यांनी संपादित केलेली ‘कलास्पर्श’ स्मरणिका पसरणी येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली होती. या कार्याचा गौरव करत अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी अशोक इथापे यांच्या पत्रकारिता व समाजसेवेतील योगदानाचे कौतुक केले. या संधीच्या माध्यमातून संकल्प न्यूजने आणखी उंच भरारी घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी नियमित अंक प्रसिद्धी, समतोल वृत्तांकन आणि सातत्यपूर्ण पत्रकारितेच्या कार्यामुळेच अशोक इथापे यांना ही अधिस्वीकृती प्राप्त झाल्याचे सांगितले.

अधिस्वीकृती मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, खासदार नितीनकाका पाटील, वाई तालुका मराठी पत्रकार संघ, भुईंज प्रेस क्लब, नगराध्यक्ष अनिल सावंत, पद्मश्री शाहीर साबळे प्रतिष्ठानचे पदाधिकारी व  संचालक, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अशोक इथापे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

छायाचित्र ओळी : अशोक इथापे यांना अधिस्वीकृती कार्ड प्रदान करताना अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे व पत्रकार जीवनधर चव्हाण

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!